शिवसेनेने आव्हान देण्यापूर्वीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. शिवसेनेने ती ऑनलाईन पाहावी; पण तुमचे काय? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला केला आहे. तुमची संपत्ती जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे, असा सल्लाही दानवे यांनी शिवसेनेला दिला आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची आज नाशिकमध्ये सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचे प्रगतिपुस्तकच वाचून दाखवले. निवडणूक तिकीटासाठी भाजप पदाधिकारी पैशांची मागणी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून भाजपवर विरोधी पक्ष तुटून पडले होते. त्यावरूनही दानवे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सध्या राज्यात पक्षाशी संबंधित काही चित्रफिती प्रसारित करून पक्षाचे नाव बदनाम करण्याचा कसा प्रयत्न केला जात आहे, याकडे लक्ष वेधले. अशा प्रकारच्या भ्रष्ट कल्पनांवर राजकारण चालत नाही, असे ते म्हणाले. भाजपवर करण्यात येणाऱ्या आरोपांबाबत समोरासमोर बसून चर्चा करू. अफवा पसरवून जनतेची दिशाभूल कोणी करू नका, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यावरही त्यांनी भाष्य केले. शिवसेनेला भाजपसोबत कधी युती करायचीच नव्हती. सध्या केवळ भाजपवरच टीका करण्याचा प्रयत्न एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून केला जात आहे. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली जात नाही. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत छुपी युती केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपत्ती जाहीर करावी, असे आव्हान भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिले होते. त्यावर शिवसेनेनेही भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. सोमय्यांना इतकीच हौस असेल तर, त्यांनी आधी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती जाहीर करावी, असे आव्हान शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिले होते. उद्धव ठाकरे यांचे सात कंपन्यांशी आर्थिक लागेबंध असून, त्यांनी आपली संपत्ती जाहीर करावी, असे किरीट सोमय्या म्हणाले होते. यावर स्वत:च्या खासदारकीच्या लेटरहेडवर इतरांच्या संपत्ती तपासण्याचा अधिकार सोमय्यांना दिला कोणी, असा सवाल शेवाळे यांनी केला होता. राष्ट्रीय शेअर बाजारात घोटाळ्याचा दावा करणाऱ्या सोमय्या यांनी २०१६ साली स्वत:च पंतप्रधान कार्यालयाला पत्र देऊन सदर प्रकरण दाबले होते. या घोटाळ्यातील सोमय्यांच्या संशयास्पद सहभागाची चौकशी व्हावी. आरोपांच्या नावाखाली सोमय्या यांनी ब्लॅकमेलिंगचा धंदा उघडला आहे, असा आरोप त्यांनी केला होता.