नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, मुंबई – आग्रा महामार्गावर इंदिरा नगर भुयारी मार्गालगत अॅम्ब्युलन्समध्ये सापडलेला मद्यसाठा नक्की कुणाचा, असा प्रश्न जनतेला पडला आहे. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत अॅम्ब्युलन्समधून जप्त केलेल्या दारुची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये इतकी आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत दारूचा वाहणारा पूर, त्यामुळे घडलेले अनुचित प्रकार या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच एक बैठक घेतली होती. या बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे राजकीय पक्षांसह अनेकांचे धाबे दणाणले होते. निवडणुकांदरम्यान दारूचा होणारा वापर, अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने ठोस कारवाई करावी. तसेच यांसह अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली. शहरात अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले. गुरुवारी तपासणी नाक्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक आणि पोलिसांनी संयुक्तपणे तपासणी मोहीम हाती घेतली. त्याचदरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरा नगर भुयारी मार्गालगत संशयास्पदरीत्या अॅम्ब्युलन्स दिसून आली. पोलिसांनी तपासणी केली असता, अॅम्ब्युलन्समध्ये विदेशी मद्याचे २६ खोके आढळून आले. पोलिसांनी मद्यसाठा जप्त केला. या मद्याची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये आहे. पोलिसांनी चालक अमिताभ शार्दुल याला अटक केली आहे.

विशेष म्हणजे, या अॅम्ब्युलन्सवर भाजप, मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांचे नावासह फोटो लावण्यात आले होते. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, भाजपचे पालकमंत्री गिरीश महाजन, लक्ष्मण सावजी, नगरसेवक आणि युनिक ग्रुपचे सतीश सोनवणे, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, बबन घोलप यांचा मुलगा योगेश घोलप, मनसेचे अशोक मुर्तडक, अनिल गोटे यांचे फोटो लावण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, अॅम्ब्युलन्सच्या दर्शनी भागात ‘दक्ष पोलीस टाईम्स’चा उल्लेख आहे. त्यामुळे या अॅम्ब्युलन्समध्ये सापडलेला मद्यसाठा नेमका कोणाचा आहे, असा प्रश्न येथील मतदारांना पडला आहे.