नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने अधिकृत उमेदवारांची घोषणा केल्यानंतरही आपली उमेदवारी कायम ठेवणाऱ्या २४ बंडखोरांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. बंडखोरांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला असताना प्रभाग १८ अमधून बंडखोरी करणाऱ्या गुंड पवन पवारला मात्र पक्षात कायम ठेवण्यात आले आहे. यामुळे पक्षाचा ‘पारदर्शक’ कारभार समोर आल्याची खिल्ली विरोधकांकडून उडवली जात आहे. बंडखोरांच्या यादीत पवारचे नाव नसल्याने भाजप गुंडांना आश्रय देत असल्याचे विरोधक म्हणत आहेत.

भाजपचे आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत पवन पवारने पक्षप्रवेश केला होता. पक्षाच्या उमेदवारांविरोधात त्याने सध्या दंड थोपटले आहेत. त्यामुळे इतर २४ जणांवर निलंबनाची कारवाई करताना पवारला अभय दिल्याचे भाजपच्या या कारवाईवरून दिसते, अशी चर्चा सुरू आहे. भाजपने बंडखोरांवर कारवाई केली असताना, दुसरीकडे पोलिसांच्या ‘रेकॉर्ड’वरील सनी रोकडे याला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश देण्यात आल्याने सभेला उपस्थित असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनी रोकडेविरुद्ध प्रतिबंधक कारवाईबाबत नोटीस बजावण्यात आली होती. जाहीर सभेत त्याच्या प्रवेशाची घोषणा होताच उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपमध्ये विविध पक्षांतील नगरसेवकांनी प्रवेश केला. यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते नाराज झाल्याचे बोलले जात आहे. तिकीटवाटप प्रक्रियेतही आर्थिक व्यवहार झाल्याचा कथित व्हिडिओ आणि पक्षातील अनेक इच्छुकांचे आरोप यामुळे पक्षाच्या गोटात अस्वस्थता आहे. पक्षातील अनेक बंडखोरांनी पक्षाविरोधात आपली उमदेवारी कायम ठेवली. त्यानंतर पक्षाने २४ जणांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. पक्षाबाहेर काढण्यात आलेल्या नेत्यांच्या या यादीत नगरसेविका मंदाबाई ढिकले, सरचिटणीस सुरेश पाटील, महिला आघाडी उपाध्यक्ष दीपाली भूमकर, व्यापारी आघाडीचे प्रमुख मिलिंद भूमकर, चिटणीस प्रकाश दीक्षित यांचा समावेश आहे. मात्र या यादीमध्ये प्रभाग १८ अ मधून बंडखोरी करणाऱ्या नामचीन गुंड पवन पवारचा समावेश नाही. या जागेवर पक्षाने पवार याला टाळून शरद मोरे यांना उमेदवारी दिली. मात्र, पवारला पक्षातून बाहेर काढण्याचे धाडस भाजपने दाखवले नाही. त्यामुळे पक्षातील पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जाते.