४८ इच्छुकांमध्ये घराणेशाहीचा अनेकांना ताप; शिवसेनेची नावे जाहीर

भाजप वगळता सर्वच पक्षात घराणेशाही असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केला होता. त्यातच नाशिकला दत्तक घेऊन त्याचे पालकत्व स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या दाव्याला मात्र सत्ताधारी भाजपाने हरताळ फासला आहे. महापालिकेच्या निवडणुकीप्रमाणे आता स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीतही घराणेशाही आड येऊ लागल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. पाच महिने उलटूनही नावे निश्चित करण्यामध्ये घोळ सुरू असून शिवसेनेने मात्र नावे जाहीर करत भाजपला खिंडीत गाठले आहे. दरम्यान, तीन स्वीकृत नगरसेवकांसाठी भाजपच्या ४८ जणांनी इच्छा व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी ‘भाजप राजकारणात कशासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. त्या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तान्त भाजपच्या ‘मनोगत’ या मुखपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भाजपचे कामकाज १०० टक्के लोकशाही पद्धतीने चालवले जाते, या देशात भाजप व कम्युनिस्ट सोडले तर सर्वच पक्षांत घराणेशाही असल्याचे टीकास्त्र सोडले होते. परंतु हा निकष नाशिक महापालिका निवडणुकीपाठोपाठ आता स्वीकृत नगरसेवकांची निवड करताना लागू नसावा, असे दिसून येते. पक्षातील बडे नेते आपल्या कुटुंबातील सदस्याला स्वीकृत सदस्य करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांस कितपत न्याय मिळणार, अशी साशंकता व्यक्त केली जाते.

वास्तविक, महापौर-उपमहापौर निवडणुकीनंतर महिनाभरात स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर करावी लागतात. त्यास पाच ते सहा महिने लोटूनही भाजपला तीन नावे निश्चित करता आली नाहीत. पालिका निवडणुकीत आमदारांपासून ते प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वानी सगेसोयऱ्यांना नगरसेवक बनविण्यात कसर सोडली नव्हती. त्या वेळी ज्यांना ते शक्य झाले नाही, त्यांनी स्वीकृत सदस्य निवडीवर डोळा ठेवला आहे.

प्रदेश पातळीवर पद भूषविणारे एक नेते पत्नीच्या नावासाठी आग्रही आहेत. पालिकेतील सभागृह नेत्याने निवडणुकीत पराभूत झालेल्या मुलासाठी हट्ट धरला आहे. मुलाच्या पराभवास पक्षाचे आमदार कारणीभूत असल्याची संबंधिताची तक्रार आहे. यामुळे स्वीकृतमध्ये त्यास स्थान मिळावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. एक-दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आले होते. भाजपच्या दिवंगत ज्येष्ठ नेत्याच्या घरी त्यांनी भेट दिली होती. संबंधित नेत्याचा नातू पक्ष संघटनेचे काम करतो. व्यापारी वर्गाशी नाळ जोडलेल्या या पदाधिकाऱ्यास न्याय दिला जावा, असाही प्रयत्न सुरू आहे. माजी शहराध्यक्ष आपल्या मुलासाठी प्रयत्नशील आहेत. स्वीकृत सदस्यासाठी भाजपचे एकूण ४८ जण उत्सुक आहेत.

नेत्यांच्या कार्यशैलीमुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. इच्छुकांची गर्दी, प्रदेश व स्थानिक नेत्यांचा विशिष्ट नावासाठी आग्रह या घोळामुळे नावे निश्चित होण्यास विलंब झाल्याचे अधोरेखित होत आहे.

सेनेतर्फे चार नावे जाहीर

दुसरीकडे शिवसेनेने आपल्या दोन जागांसाठी सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला. त्या अंतर्गत कार्यालयीन कर्मचारी सुनील गोडसे, राजू वाकसरे यांच्यासह अलका गायकवाड आणि महिला आघाडीच्या अ‍ॅड. श्यामला दीक्षित यांची नावे निश्चित करण्यात आली. त्यातून दोन नावे अंतिम केली जातील.

भाजपच्या एकूण ४८ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रदेश पदाधिकाऱ्यांचा आग्रह, घराणेशाही वा तत्सम कारणांमुळे नावे निश्चित करण्यास विलंब झालेला नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला. निवड प्रक्रियेत नवीन-जुने असा मेळ घातला जाईल. पक्षाकडून लवकरच नावे पालिका आयुक्तांकडे देण्यात येतील.

आ. बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप

शिवसेनेने चार नावे निश्चित केली असून पुढील प्रक्रियेबाबत पालिका आयुक्तांकडे मार्गदर्शन मागण्यात येणार आहे. आयुक्तांनी जाहीर केल्यानुसार शिवसेना आपली नावे सादर करणार आहे. अर्ज छाननीत काही अडचणी येऊ नये म्हणून चार नावांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यातून अंतिमत: दोन नावे ठरतील. सत्ताधारी भाजप त्यांची नावे देते की नाही, याचा शिवसेना विचार करणार नाही. स्वीकृत नगरसेवकांची प्रक्रिया पुढे कशी न्यायची, हा आयुक्तांचा प्रश्न आहे.

अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना