तीव्र उष्म्याच्या झळांनी अंगाची लाहीलाही होत असलेल्या उत्तर महाराष्ट्रात रविवारी आगीच्या तीन मोठय़ा घटना घडल्या. या आगीत कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रशासकीय विभागातील दालनांसह कागदपत्रे खाक झाली. दुसरीकडे नाशिक येथील अंबड लिंक रोड परिसरात शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत ५० ते ६० दुकाने भस्मसात झाली. जळगाव जिल्ह्य़ातील भुसावळ येथे मध्य रेल्वेच्या भंगार साहित्याचे आगीत नुकसान झाले. या तीनही घटनांमध्ये आगीचे निश्चित कारण समजू शकलेले नाही.

धुळे जिल्हा बँकेतील प्रशासकीय साहित्य खाक

धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारतीस रविवारी सकाळी लागलेली आग पाच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली. या आगीत प्रशासकीय व लाकडी साहित्य खाक झाले आहे. संगणकीय प्रणालीमुळे सभासद शेतकरी व ठेवीदारांच्या व्यवहाराची सर्व माहिती सुरक्षित असल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी केला आहे. दुसरीकडे आ. अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीवर या आगीबद्दल संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे म्हटले आहे.

शहरातील पाटबाजार भागात धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुख्य इमारत आहे. इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर प्रशासकीय विभाग आहे. या विभागात बँकेचे व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षांसह अन्य महत्त्वाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कक्ष आहेत. याच मजल्यावर प्रशासकीय कागदपत्रे असतात. रविवारी सकाळी सातच्या सुमारास अचानक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून धुराचे लोळ बाहेर पडताना काहींनी पाहिले. बँकेला आग लागल्याचे कळताच अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलानेही घटनास्थळी धाव घेतली. तब्बल पाच तासांपेक्षा अधिक काळ पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीत काही अधिकाऱ्यांचे कक्ष, कपाट, प्रशासकीय साहित्य जळून खाक झाले. कदमबांडे यांनी मात्र सभासद शेतकऱ्यांना कर्ज वाटपाची प्रक्रिया लगेच सुरू करण्यात येणार असून संगणकीय प्रणालीमुळे सर्व दस्तावेज सुरक्षित असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. आगीसंदर्भात करण्यात येत असलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी बँकेचे सर्व दस्तावेज नाशिक येथेही सुरक्षित असल्याने काळजीचे कारण नसल्याचे सांगितले. शहरात यापूर्वीही अशा आगीच्या घटना घडल्या आहेत. निबंधक कार्यालय, महानगर पालिकेचे दस्तावेज दालनही याआधी आगीत खाक झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दरम्यान, आ. अनिल गोटे यांनी आगीबद्दल संशय व्यक्त करून गुन्हेगारी तंत्राचा हा एक भाग असल्याचा आरोप केला आहे. बँकेशी संबंधित राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण होत आली असल्याची जाणीव झाल्याने पुराव्यांची कागदपत्रे नष्ट करण्यासाठी हा प्रकार केला गेला असावा. या प्रकाराची गुन्हे अन्वेशष विभाग किंवा विशेष पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असे गोटे यांनी म्हटले आहे.

नाशिकमधील आगीत ६० भंगार गोदामांचे नुकसान

नाशिक शहरातील सातपूर-अंबड लिंकरोडवर शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत ५० ते ६० भंगार गोदामांचे नुकसान झाले. सुमारे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज भंगार व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आग विझविताना एक जण जखमी झाला असून नाशिक विभागातील १२ ते १३ अग्निशमन बंबांनी पाच ते सहा तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

सातपूर-अंबड लिंकरोडवर आझादनगर खाडी भागात भंगार व्यावसायिकांची लहान-मोठी पाचशेपेक्षा अधिक गोदामे आहेत. या गोदामांमध्ये प्लास्टिक, कागदी पुठ्ठे यांचा भरणा अधिक आहे. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास एका गोदामास आग लागली. या आगीने एकापाठोपाठ एक इतर गोदामांनाही वेढा दिला. आगीची माहिती मिळताच नाशिक अग्निशमन दलाने धाव घेतली. आगीची भीषणता लक्षात आल्यावर विभागातील इतर सर्व अग्निशमन दलांना बोलविण्यात आले. देवळाली छावणी, महिंद्र कंपनी यांच्याही बंबांची मदत घेण्यात आली. अखेर पाच ते सहा तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग विझविताना अब्दुल शेख हा भंगार व्यावसायिक जखमी झाला. या आगीत तीन कोटींपेक्षा अधिक मालाचे नुकसान झाल्याचा अंदाज भंगार व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. आगीचे कारण कळू शकले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.

भुसावळ मध्य रेल्वेच्या भंगारास आग

भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या एका विभागातील भंगार साहित्याला रविवारी सकाळी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तब्बल २० अग्निशमन बंबांनी सुमारे चार तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

रेल्वेच्या पीओएच शेडमधील कुंपणाजवळ भंगार साहित्याचा साठा आहे. सकाळी नऊच्या सुमारास या साठय़ास अचानक आग लागून बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. शेजारी राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. नगरपालिका, भुसावळ आयुध निर्माणी, दीपनगर, सावदा, फैजपूर येथील पालिकेच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. भंगार साहित्याजवळ रंग व इंधनाने भरलेल्या टाक्या असल्यामुळे त्यांचे स्फोट होण्यास सुरुवात होऊन आगीत अधिकच भर पडली. आगीचे रौद्ररूप पाहून शेजारील रहिवाशांनी आपापल्या घरातील गॅसला जोडलेल्या नळ्या काढून टाकल्या. आगीचे कारण समजू शकले नसले तरी शेजारील रहिवाशांनी पेटविलेल्या कचऱ्याची ठिणगी उडून आग लागली असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.