उत्तर महाराष्ट्र पालिका निवडणूक

नगरपालिका निवडणुकांचा प्रचार संपण्यास अवघे चार दिवस बाकी राहिल्याने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात प्रमुख राजकीय पक्षांनी आपआपले हुकमी एक्के प्रचारात उतरविले असून गल्लीतील कचराकुंडीच्या समस्येपासून ज्याचा पालिका निवडणुकीशी काहीही संबंध नाही असा नोटाबंदीचा विषयही प्रचारात मांडला जात आहे. नोटाबंदी असो, कृषिमालाचे कोसळलेले भाव असो वा वाढती महागाई या सर्व समस्यांना केंद्र व राज्यातील भाजप हाच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असताना केंद्र व राज्याप्रमाणे पालिकेची सत्ताही भाजपच्या ताब्यात दिल्यास सर्व समस्या परिणामकारकरीत्या सुटू शकतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे.

नाशिक जिल्ह्य़ात मनमाड, नांदगाव, सटाणा, येवला, सिन्नर, भगूर या सहा नगरपालिकांची निवडणूक होत आहे. नांदगाव, सिन्नर, भगूर येथे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी असून येवल्यात भाजप-सेना यांच्यात युती असली तरी चार जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार उभे आहेत. या सहापैकी भगूर, सिन्नर आणि काही प्रमाणात मनमाडचा अपवाद वगळता इतर तीन पालिकांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. केंद्र व राज्यात सत्ता असूनही जिल्ह्य़ात केवळ सिन्नर ही एकच पालिका ताब्यात असलेल्या भाजपने निवडणूक प्रचारात सर्वस्व ओतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंपर्यंत जे जे नेते उपलब्ध होतील त्या सर्वाना भाजपने प्रचारात उतरविले आहे. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री सुरेश धस ही मंडळी किल्ला लढवीत आहेत. तुलनेत शिवसेना आणि काँग्रेसने जिल्हास्तरीय नेत्यांवरच प्रचाराचा भार सोपविल्याचे चित्र आहे. शिवसेनेत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे प्रचाराचा गाडा ओढत आहेत.

[jwplayer zkvFlBpu-1o30kmL6]

भाजपचा भर पुन्हा मोदींवरच

प्रचार सभांमध्ये भाजपच्या नेत्यांकडून स्थानिक मुद्दय़ांवर कमी, तर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विषयांवर अधिक भर दिला जात आहे. प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचा ग्रामीण भागालाही कसा लाभ होत आहे, काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी करण्यात आलेली नोटाबंदी, राज्य सरकारकडून पालिकांना करण्यात येणारी आर्थिक मदत, रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे शहरांच्या विकासास होणारी मदत हे विषय मांडण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवरील अस्वच्छता, पाणीटंचाई, रस्त्यांची बिकट अवस्था अशी कोणतीही समस्या असो, त्या समस्या दूर करण्याचा एकच मार्ग म्हणजे भाजपला मतदान असे प्रचार सभांमधून बिंबविले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिन्नर येथे घेतलेल्या सभेत समृद्धी महामार्गाचा विषय मांडल्याने भाजपपुढे वेगळीच समस्या उभी राहिली आहे. महामार्गासाठी भूसंपादनास सिन्नर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा विरोध असताना या प्रश्नी मध्यस्थी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेते माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावर टाकली. कोकाटे यांनी या प्रकरणात लक्ष घालू नये, असे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विरोधकांकडून हा मुद्दा प्रचारात अधिकच तापविण्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादीला भुजबळांची अनुपस्थिती

मराठा क्रांती मोर्चामुळे ढवळून निघालेले वातावरण, कांद्यासह इतर कृषिमालास मिळणारा अल्प भाव, दिवसेंदिवस वाढणारी महागाई, नोटाबंदीमुळे नागरिकांचे होणारे हाल हे विषय राष्ट्रवादीकडून मांडले जात आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे आहे ते बळ टिकवून ठेवण्याचे आव्हान जिल्हा नेत्यांपुढे आहे.

धुळ्यात घराणेशाही

धुळे जिल्ह्य़ातील शिरपूर आणि दोंडाईचा येथील निवडणूक स्थानिक दिग्गजांच्या कुटुंबातील सदस्य रिंगणात असल्याने आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहेत. शिरपूर पालिकेवर कित्येक वर्षांपासून काँग्रेसचे माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व आहे. या वेळी नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नी जयश्रीबेन पटेल रिंगणात आहेत. शहरासह तालुक्यात केलेली विकासकामे, सिंचन योजना या मुद्दय़ांवर पटेल यांच्याकडून भर दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही विकासकामांच्या बाबतीत पटेल यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. त्यामुळे पटेल यांच्याविरुद्ध कोणत्या मुद्दय़ावर प्रचार करावा, या गुंत्यात अजूनही भाजपचा प्रचार अडकलेला आहे. दोंडाईचात भाजपचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादीतून अलीकडेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी आपले बंधू डॉ. रवींद्र देशमुख यांना त्यांच्याविरुद्ध रिंगणात उतरून आव्हान निर्माण केले आहे.

प्रचारातील वैशिष्टय़े

  • राजकीय पक्षांना काही पालिकांमध्ये स्थानिक आघाडय़ांच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यात सटाण्यात शहर विकास आघाडी, मनमाडमध्ये मनमाड बचाव कृती समिती, शहाद्यात लोकभारती आदींचा समावेश आहे.
  • सटाणा पालिकेच्या प्रचारात भाजपचे उमेदवार बाळासाहेब सोनवणे यांनी ‘मी काय केले नाही आणि काय करणार नाही’ अशा उल्लेख असलेल्या पत्रकांचे वाटप करून इतरांचा नामोल्लेख न करता इतर उमेदवारांवर टीकास्त्र सोडले आहे.
  • भगूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून पथनाटय़ाद्वारे तसेच एका गाडीवर टीव्ही संच लावून कोणकोणती कामे करण्यात आली आहेत, ते सीडीद्वारे दाखवून प्रचार केला जात आहे.

भाजपपुढे स्वपक्षीयांचेच आव्हान

एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील शीतयुद्धामुळे जळगाव जिल्ह्य़ातील १२ नगरपालिका आणि एका नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपपुढे  स्वकीयांच्या बेबंदशाहीचे आव्हान अधिक आहे. या निवडणुकीस खडसे-महाजन एकत्रितपणे सामोरे जात असल्याचे अजूनही दिसत नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी एकाच दिवसात जिल्ह्य़ात तीन सभा घेतल्या. राष्ट्रवादी (धनंजय मुंडे, सुरेश धस वगळता) शिवसेना, काँग्रेस यांच्याकडून अद्याप बडे नेते प्रचारास आलेले नाहीत. शिवसेनेची मदार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आहे.

नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा पालिकेत सत्ताधारी काँग्रेेसला राष्ट्रवादी तसेच लोकभारती आघाडीचे आव्हान आहे. सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार हा विषय विरोधकांनी प्रचाराचा मुद्दा केला आहे.

[jwplayer izOWW4O7-1o30kmL6]