८४ अनधिकृत धार्मिक स्थळांवर लवकरच कारवाई

न्यायालयीन आदेशानुसार महापालिका क्षेत्रात २००९ नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे तातडीने हटविण्यासंदर्भात लवकरच कारवाई सुरू करण्यात येणार असून त्याअंतर्गत प्रथम टप्प्यात कारवाई करण्यात येणाऱ्या ८४ अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीस देण्यात आली आहे.

राज्यात अनेक मोठय़ा शहरांमध्ये कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी धार्मिक स्थळांची उभारणी झाली आहे. अशा प्रकारच्या अवैध धार्मिक स्थळांमुळे होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने २००९ नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. आदेशानंतरही कारवाई करण्यास चालढकल होत असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने ताशेरे ओढले होते. त्यामुळे २००९ नंतरच्या सार्वजनिक रस्त्यांवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

प्रथम टप्प्यामध्ये पालिकेच्या सहाही विभागीय कार्यालय क्षेत्रांत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईची नोटीस चिकटविण्यात आली आहे. त्यात नाशिक पूर्व १४, नाशिक पश्चिम १७, सातपूर, १०, मध्य नाशिक ४, पंचवटी २५, नाशिक रोड १४ याप्रमाणे एकूण ८४ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. संबंधितांनी आपआपली अनधिकृत धार्मिक स्थळे हटवून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.