अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नाशिक शाखेच्यावतीने २४ ते २६ मे या कालावधीत अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे येथे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ रंगकर्मी सुहास अष्टपुत्रे यांच्या हस्ते होणार आहे.
महाकवी कालिदास कला मंदिरात होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेचे अतिरीक्त आयुक्त जीवन सोनवणे, डॉ. अनिरूध्द धर्माधिकारी उपस्थित राहणार आहे. नाटय़ परिषद नाशिक शाखेच्यावतीने आयोजित एकांकिका स्पर्धेत पहिल्या टप्प्यात साधारणत ४० एकांकिका आल्या. मात्र महोत्सवात निवड झालेल्या २२ एकांकिका सादर होणार आहेत. सकाळी ११.३० ते रात्री ८ या वेळेत तीन दिवस स्पर्धा सुरू राहणार आहे.
उद्घाटन सोहळ्यानंतर पहिल्या सत्रात नाटय़ांकुरची ‘डबल क्रॉस’, पंचरत्न थिएटरची ‘चूक की बरोबर’, लोकहितवादी मंडळाची ‘लग्नाची गोष्ट’, दुसऱ्या सत्रात एल. व्ही. एच. महाविद्यालयाची ‘जंगल’, रंगकर्मी प्रतिष्ठान ‘स्टॅच्यु’, विजिगीषा नाटय़ अकादमीची ‘एका स्वप्न गर्भाचा मृत्यू’, जगदंब ग्रुपची ‘जन्म’ आणि नाटय़सेवातर्फे ‘विक्टोरियल इस्ट’ एकांकिका सादर होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी ‘वेटीग फॉर गोदो’, सृजन प्रतिष्ठान ‘कनकल्युझन’, आवेग क्रिएशन ‘जस्ट लाईक दॅट’, प्रिय कलाकृतीचे ‘थेंबाचे टपाल’, तिहाई कलासागर ‘कालाय तस्मै नम’, बिहाईंड दी स्टीमची ‘ट्रक इट ईजी’, मैत्री कला मंच ‘बोनसाय’ तर तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी नाटय़नादची ‘वर्दळ’, रंगोदय रुपांतरची ‘तुम्ही -नॉट टू मी’, संक्रमण संस्थेची ‘समेवर टाळी’, स्वामी नाटय़ानंदतर्फे ‘अल्पविराम’, व्यक्तीची ‘प्रतीगांधी’, नाटय़प्रेमी प्रतिष्ठान ‘वारूळातील मुंगी’ आणि निर्मिती रंगमंचची ‘ड्रायव्हर’ या एकांकिका होणार आहे. पुणे, डोंबिवली, मुंबई, ठाणे, अहमदनगर, नाशिक येथील संस्था स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. समारोपाच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचे पारितोषिक वितरण नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या उपस्थितीत होईल. स्पर्धेस परीक्षक म्हणून विद्या करंजीकर, दत्ता पाटील आदी काम पाहणार आहेत. एकांकिका महोत्सवास नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.