नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी महामार्गालगतच्या उंटदरीत कार कोसळल्याची घटना आज (सोमवारी)सायंकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारांसाठी नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

नाशिक येथील कटाकीया कुटुंब सहलीसाठी इगतपुरीला आले होते. उंटदरीजवळ कार पार्क करुन सेल्फी काढून कटाकीया कुटंबीय घराच्या दिशेने परत निघाले होते. सर्व जण गाडीत बसलेले असताना खाली काही राहिले का, हे पाहण्यासाठी हरिष कटाकीया गाडीतून उतरलेले असता त्यांच्या मुलाने गाडीचा रिव्हर्स गिअर टाकला. ही बाब हरिष यांच्या लक्षात आली नाही. त्यांनी गाडी सुरू करुन रेस केली असता काही सेकंदातच गाडी दरीत कोसळली आणि मोठी दुर्घटना झाली. या घटनेत हरीष यांची १५ वर्षाची मुलगी वैष्णवी मृत्युमुखी पडली. तर इतर चार जण जखमी झाले.

आज (सोमवारी) सायंकाळी चारच्या सुमारास आडगाव नाका परिसरातील कोणार्क नगर येथील हॉटेल जत्राजवळ नाशिक येथील रहिवासी हरिष गोपाल कटाकीया (वय ३९ वर्ष) आणि पत्नी गीता हरिष कटाकीया (वय ३४), मुलगी अदिती (वय ९ वर्ष), मुलगा रुद्रा (वय ७ वर्ष) आणि मुलगी वैष्णवी हे पाचही जण आय टेन (एम.एच.१५ डीएम- २५५१) या गाडीने इगतपुरी महामार्गालगत कसारा घाट माथ्यावर उंटदरीच्या जवळच गाडी पार्क करून निसर्गाचा आनंद घेत होते. मात्र अंधार होण्यापूर्वी घरी गेले पाहिजे, या विचाराने हे कुटुंब गाडीत घाईत बसले. मात्र ७ वर्षाच्या रूद्राने खेळता खेळता गाडीचा गियर रिव्हर्समध्ये टाकला. दरीच्या कडेला असलेली ही गाडी हरिष यांनी सुरू केली असता, गाडी काही सेंकदातच सुमारे पाचशे ते सहाशे फूट खोल खाली दरीत कोसळली. सायंकाळी साडे पाच ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली.

दरम्यान घटनेची माहिती परिसरातील काही पर्यटकांना समजताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तेव्हा पोलीस पोहचण्याअगोदरच महामार्ग सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दरीत दोराच्या सहाय्याने उतरून जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे माती आणि दगड ओले असल्याने क्रेनला दोर बांधून दरीत उतरुन पथकाने जखमींना बाहेर काढले. त्यात हरिष यांची १५ वर्षाची मुलगी वैष्णवी मृतावस्थेत आढळून आली. तर हरिष, त्यांची पत्नी गीता, मुलगी अदिती, मुलगा रूद्रा हे गंभीर जखमी असल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यांनतर त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवी देहाडे, विजय कुंडकर, किशोर भडांगे, शिरपत काळे, फिरोज पवार, महेश शिरोळे, प्रथमेश पुरोहित, नाना बोराडे, रवी दुर्गुडे, दिपक डघाडे, दत्ता रोडेकर आदींनी जखमींना वाचवण्यासाठी परिश्रम घेतले.