बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असताना अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून हमी भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक अडचणीत सापडले असल्याची भूमिका अखिल चांदवड तालुका सामाजिक कृषी मंचने मांडली आहे. उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळाल्यास तो कांदा उत्पादकांच्या हिताकरिता महत्वपूर्ण निर्णय राहील, असे मंचचे म्हणणे आहे.

कांदा हा आज मातीमोल भावाने विकावा लागत आहे. प्रति क्विंटल दोन हजार रुपये हमी भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मंचचे सामाजिक कार्यकर्ते बापूकाका आहेर यांनी दिला आहे. डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा गृहीत धरून शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. उत्पादन खर्च ठरविताना शेतमालकाचे श्रम, देखरेख, बैलजोडीचे श्रम, त्यांचा वर्षभर करावा लागणारा सांभाळ, चारा, पाणी, औषधोपचार आदी खर्च विचारात घेतला पाहिजे. शासनाला खरोखर शेती व्यवसाय नफ्यात चालावा, शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालाचा उत्पादित खर्च अधिक ५० टक्के नफा गृहीत धरून हमी भाव दिला पाहिजे. त्यामुळे शेती व्यवसाय तोटय़ात राहणार नाही, असे मत आहेर यांनी मांडले आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांच्या पाश्र्वभूमीवर परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी शासनाने कृषी तज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांच्या पुढाकाराखाली समिती नेमली होती. या समितीने ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि उपाय’ या अहवालात उत्पादन खर्च भरून निघेल एवढे उत्पन्न शेतीतून मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे म्हटले आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा  उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, लग्न आदींसाठी खर्च करणे कठीण झाले आहे. या स्थितीत उत्पादन खर्च व अधिक इतर खर्चाच्या किमान ५० टक्के नफा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, असे नमूद केले आहे. शासनानेच नेमलेल्या समितीच्या अहवालाची शासनाने अंमलबजावणी करावी, कांदा उत्पादकांना चांगला दर मिळावा अशी मागणी मंचने केली आहे.