देशांतर्गत मागणी वाढू लागल्यानंतर या हंगामात प्रथमच उन्हाळ कांद्याने प्रति क्विंटलला एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. मध्य प्रदेशातील कांदा संपुष्टात आल्यामुळे आता देशात केवळ महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा शिल्लक आहे. यामुळे सप्टेंबपर्यंत त्याचे भाव वधारत राहणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

वर्षभरापासून दोलायमान अवस्थेत राहिलेल्या कांद्याला एक हजार रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. मागील काही वर्षांचा अनुभव पाहिल्यास उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळत असतो. परंतु, गतवर्षी विक्रमी उत्पादन होऊन भाव कोसळले होते. तेव्हापासून कांद्याची घाऊक बाजारपेठ अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मागील हंगामातील लाल कांद्याला जेमतेम भाव मिळाले. उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर प्रति क्विंटलचे भाव ५०० रुपयांच्या आसपास फिरत राहिले. गत दहा दिवसात वेगवेगळ्या राज्यातून मागणी वाढू लागल्यानंतर कांद्याच्या भावात सुधारणा होत आहे. १० जुलै रोजी लासलगाव बाजारात प्रती क्विंटलला सरासरी ६११ रुपये भाव मिळाला होता. बुधवारी हाच भाव एक हजार रुपयांवर पोहोचला. या दिवशी २७ हजार ३०० क्विंटलची आवक झाली. त्यास किमान ३०० ते कमाल १२०० रुपये भाव मिळाला. या वर्षांत पहिल्यांदा कांदा भावाने ही पातळी गाठली आहे. सटाणा बाजार समितीत १२ हजार क्विंटलची आवक झाली. त्यास सरासरी ९५० रुपये भाव मिळाला.

मागील महिन्यात मध्य प्रदेशमधील कांदा अल्प दरात देशांतील बाजारात पाठविला जात होता. शेतकरी आंदोलनामुळे मध्य प्रदेश सरकारने ८०० रुपये दराने खरेदी केलेला कांदा व्यापाऱ्यांना अल्प दरात विकला. यामुळे तो माल अल्प दराने देशात पाठविला जात होता. तो कांदा संपुष्टात आल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा दरात वाढ होण्यास सुरूवात झाल्याचे नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी सांगितले. उत्पादन खर्चाचा विचार करता सद्यस्थितीत मिळणाऱ्या भावातून शेतकऱ्याला लाभ होईल, अशी स्थिती नाही. पुढील काळात कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. सप्टेंबपर्यंत हे भाव १५०० ते २००० रुपयांवर पोहोचतील, असा अंदाज होळकर यांनी व्यक्त केला.

डाळिंब गडगडले

तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसमादे पट्टय़ात डाळिंबाच्या क्षेत्रात कमालीची घट होऊन उत्पादनही कमी झाले. या स्थितीत डाळिंबाचे घाऊक बाजारातील भाव कमालीची गडगडले. चार दिवसांपूर्वी प्रति जाळीचा (२० किलो) सरासरी १८०० असणारा भाव बुधवारी ८०० रुपयांपर्यंत खाली आला. कवडीमोल भावाने माल विकावा लागत असल्याने उत्पादक हतबल झाले आहे. बुधवारी सटाणा बाजार समितीत एकूण ६२०० जाळ्यांची आवक झाली. आवक वाढल्याने दर घसरले. या दिवशी प्रति जाळीला कमाल १२४० रुपये तर किमान ४० रुपये भाव मिळाला. सरासरी भाव ८०० रुपये होते. शेतकऱ्यांनी डाळिंब विक्रीसाठी आणताना प्रतवारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कसमादे पट्टय़ात दोन वर्षांपूर्वी डाळिंबाचे एकूण ७५ हजार हेक्टर क्षेत्र होते. तेल्या रोगामुळे हे क्षेत्र सध्या १६ हजारावर आले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फवारणी व तत्सम खर्चात वाढ झाली.