देशाची गरज दहा लाख टन प्रतिमहिना; इजिप्तमधून आयात करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

देशाची कांद्याची गरज आहे महिन्याकाठी साधारणत: दहा लाख टन. सध्या केवळ महाराष्ट्रातच कांदा उपलब्ध असून तो आहे, अंदाजे १० ते १२ लाख टन. नवीन कांदा येण्यास दोन-अडीच महिन्यांचा अवधी आहे. तोपर्यंत हा साठा देशाची गरज कशी पूर्ण करणार? हे लक्षात घेऊन काही बडे व्यापारी इजिप्तवरून कांदा आयात करणार आहेत; परंतु तसे करूनही देशाची निकड भागणार नाही. या स्थितीमुळे पुढील काळात कांद्याचे दर ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार असल्याचे चित्र आहे.

वर्षभरापासून गडगडणाऱ्या कांदा दराने अलीकडेच उसळी घेत अल्पावधीत प्रति क्विंटलला अडीच हजारांचा टप्पा ओलांडला. भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी चाळीत साठविलेला कांदा बाजारात नेण्यास प्राधान्य दिले. त्यात पुढील सप्ताहात बाजार समित्यांना तीन ते चार दिवस सुटी असल्याने आवक लक्षणीय वाढून दर २०० रुपयांनी खाली आले; परंतु ही तात्पुरती घसरण असून कोणी परदेशातून कांदा मागविला तरी देशांतर्गत बाजारात दर कमी होण्याची चिन्हे नसल्याचा अनुमान तज्ज्ञांनी काढला आहे. उन्हाळ्यात साठविलेला कांदा सप्टेंबर व ऑक्टोबपर्यंत बाजाराची गरज भागवितो. सद्य:स्थितीत महाराष्ट्र वगळता अन्य कोणत्याही राज्यात उन्हाळ कांदा नाही. त्याद्वारे देशाची दोन ते अडीच महिन्यांची गरज भागणार नसल्यामुळे बडे व्यापारी इजिप्तमधून तो आणून नफा कमावण्याची तयारी करीत आहे. गोदीपर्यंत आलेला परदेशी कांदा देशातील विविध भागांत नेईपर्यंत त्याचा दर अडीच हजार रुपये क्विंटलपर्यंत जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे, इजिप्त आणि महाराष्ट्रातील कांद्याच्या चवीत कमालीचा फरक आहे. परदेशी कांदा ग्राहकांना रुचत नाही. हॉटेल व्यावसायिक त्याचा वापर करतात. त्या ठिकाणी उपलब्ध माल, वाहतुकीला लागणारा कालावधी, त्याची टिकण्याची क्षमता यामुळे आयातीला मर्यादा आहेत. त्या कांद्याला भारतीय कांद्यापेक्षा कमी दर मिळतात. तो आल्यामुळे देशांतर्गत बाजारात दर घसरणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल लगेचच विक्री करण्याची घाई करू नये. माल टप्प्याटप्प्याने विक्री करून लाभ घेण्याची गरज असल्याचे कांद्याच्या जागतिक बाजारपेठेचे अभ्यासक तथा नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी सांगितले.

काही व्यापाऱ्यांनी इजिप्तमधून कांदा मागविला आहे. तो कांदा आकाराने मोठा असला तरी चवीत फरक आहे. त्यामुळे त्याचा भाव भारतीय कांद्याच्या तुलनेत किलोला चार ते पाच रुपयांनी कमी असतो. कांदा आयातीची माहिती पसरल्याचा स्थानिक घाऊक बाजारावर मानसिक परिणाम झाला. भाव कमी होतील या धास्तीने शेतकरी मोठय़ा प्रमाणात माल बाजारात आणत आहे. आवक वाढल्याने कांद्याचे दर क्विंटलला ४०० ते ५०० रुपयांनी कमी झाले. वास्तविक, इजिप्तमधून अतिशय कमी प्रमाणात माल येईल. स्थानिक शेतकऱ्यांनी त्या धसक्याने आताच कांदा विक्री केली तर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये देशात कांदाटंचाई निर्माण होईल, असे नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले.

सद्य:स्थिती अशी..

  • अतिवृष्टीमुळे गुजरात व राजस्थानमध्ये पिकाचे मोठे नुकसान
  • तामिळनाडूमध्ये उत्पादन कमी
  • कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोणंद, माण, फलटण भागांतील कांदा लवकर बाजारात येतो. त्यास ऑक्टोबर उजाडेल.
  • तोपर्यंत परदेशातून आयात करूनही कांद्याची दरवाढ रोखता येणार नाही