दोन कोटी वृक्ष लागवड बैठकीत सुधीर मुनगंटीवार

वृक्ष लागवडीसोबत त्यांचे संगोपन होणे तितकेच महत्त्वाचे आहे. याकरिता नवनवीन संकल्पनांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यात येणार आहे. रोपांसाठी केलेल्या खड्डय़ांच्या अक्षांश व रेखांशाच्या नोंदी घेतल्या जातील. तसेच रोपांच्या लागवडीनंतर ‘ऑनलाइन रेकॉर्ड’ ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वन विभागाने हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या तयारीचा आढावा येथील विभागीय आयुक्त कार्यालयात वनमंत्र्यांनी घेतला. या वेळी त्यांनी विविध घटकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता वृक्ष लागवड संकल्पनेचे व्यापक जनचळवळीत रूपांतर होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

या बैठकीस गृहराज्यमंत्री राम शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या संकल्पनेला प्रशासन, जनता व स्वयंसेवी संस्थांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. दोन कोटी वृक्ष लागवडीचे शिवधनुष्य उचलण्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल सावरण्यासाठी प्रत्येकाच्या मनात वृक्षप्रेमाचे बीजारोपण व्हावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रत्येक वर्षी वृक्ष लागवडीची मोहीम राबविली जाणार असून २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले. ज्यांना वृक्ष लागवड करणे शक्य होणार नाही, त्यांनी वृक्ष दान करावे, असे आवाहन भुसे यांनी केले. प्रत्येक जिल्ह्य़ाचे नियोजन चांगले झाल्यास लक्ष्यांक गाठता येईल, असे गृहराज्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी राज्यातील वृक्षाच्छादित भूभाग सरासरी कमी असल्याने ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ४० हजार चौरस किलोमीटर क्षेत्राएवढी वृक्ष लागवडीची गरज व्यक्त केली. या उपक्रमांतर्गत नाशिक विभागात ७१ लाख ५४ हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. त्याकरिता आतापर्यंत ७७ लाख ८९ हजार खड्डे तयार करण्यात आले आहेत, तर ८१ लाख ८९ हजार रोपे तयार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या वेळी विभागातील पाचही जिल्ह्य़ातील जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडी मोहिमेचे सादरीकरण केले.