येत्या एक नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या येथील मालेगाव र्मचटस् सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुकांचा वाढता उत्साह बघता यावेळी ही निवडणूक अटीतटीची होण्याची तसेच चांगली गाजण्याची चिन्हे आहेत. संचालकांच्या १९ जागांसाठी शंभरावर अर्ज दाखल झाले असून यानिमित्ताने सत्ताधारी हरिलालशेठ अस्मर-राजेंद्र भोसले गटासमोर तगडे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असल्याचे दिसते.
मामको बँकेत अस्मर-भोसले गटाचा गेल्या काही वर्षांत दबदबा निर्माण झाला आहे. यापूर्वी गेल्या दोन-तीन निवडणुकांमध्ये या गटाला सत्तेतून पायउतार करण्याचे प्रयत्न विरोधकांनी करून पाहिले. मात्र त्या-त्या वेळी हे प्रयत्न निष्प्रभ ठरले. यावेळच्या निवडणुकीत विरोधकांकडून पुन्हा सत्तांतर घडविण्याचा निर्धार सुरू झाला असून त्याला किती यश येते, याविषयी शहरवासियांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे. सत्ताधारी गटातील पाच विद्यमान संचालकांनी विरोधाचा सूर आळवत प्रबळ विरोधी पॅनल निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार हे यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ठय़े ठरणार असून तीच बाब सत्ताधारी गटाला अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
सहकार क्षेत्रात नावलौकिक निर्माण करणारी अशी या बँकेची ओळख असून तीची सभासद संख्या जवळपास २३ हजाराच्या घरात आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र भोसले यांच्यावर मनमानी तसेच पद लालसेचे आरोप करत अशोक बैरागी, दादाजी वाघ, रवींद्र दशपुते, सतीष कलंत्री व सुभाष सूर्यवंशी या पाच संचालकांनी सत्ताधारी गटाशी फारकत घेत विरोधी पॅनल निर्माण करण्याची तयारी सुरू केली. या प्रयत्नांना अस्मर-भोसले गटाच्या पारंपरिक विरोधकांची तसेच गेल्या काही वर्षांत या गटाकडून दुखावलेल्या विविध घटकांची साथ मिळाली आहे.
येत्या २३ ऑक्टोबपर्यंत अर्ज माघारीची मुदत असल्याने त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. प्रचारासाठी उपलब्ध होणारा अल्प कालावधी बघता दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केल्याने इच्छुकांनी प्रचार व गाठीभेठी सुरू केल्या आहेत.