पैठणीवरील पदरावरच्या नाचणारा मोर.. कुयरीच्या बुट्टी.. कमळाची फुले.. बांगडीतील चार मोर, पोपट व हंस.. यासह अन्य काही आकर्षक नक्षीकाम यांची जागा आता आदिवासी बांधवांच्या ‘वारली’ चित्रशैलीने घेण्यास सुरूवात केली आहे. येवला तालुक्यातील नागडे या छोटय़ाशा गावातील कारागिराने बाजारपेठेत आणलेली ही नवीन कलाकृती महिलांसाठी आकर्षण ठरत आहे. नेहमीच्या साजात पहावयास मिळणाऱ्या पैठणीच्या कलाकुसरीत या निमित्ताने वेगळे प्रयोगही होऊ लागले आहेत.

येवला आणि पैठणी हे समीकरण काही शतकांपासून दृढ असतांना वस्त्रप्रावरणांच्या बदलत्या बाजारपेठेत पैठणीने आजही आपले स्थान अबाधित ठेवले आहे. मोघल साम्राज्याच्या इतिहासात जरतारी रेश्माच्या विणकामाचा उल्लेख आहे. त्यानंतर पेशवाईच्या काळात या कलेचा उदय आणि विकास झाला. ही परंपरा येवल्याने अखंडित सुरू ठेवल्याने येवला शहर व परिसरात पैठणी विणकाम व्यवसाय म्हणून नावारूपास आला आहे. अस्सल रेशमी धाग्यांची गुंफण आणि सोन्याची जर याने विणलेली पैठणी यातील कमी-अधिक प्रमाणामुळे तिची किंमत किमान सात हजार ते लाखांपर्यंत पोहचली आहे. पैठणी हा महिला वर्गासाठी प्रतिष्ठेचा तसाच जिव्हाळ्याचा विषय. ग्राहकाची ही दुखरी नस ओळखत बाजारपेठेत पैठणीच्या बाबतीन सातत्याने नवे नक्षीकाम होत असते. यामुळे नाचणारा मोर, बांगडी मोर, कमळ पेशवाई, मुनिया बॅ्रकेट या विविध कलाकुसरीने पैठणीने वेगळा साज ल्यायला. या प्रयोगात तालुक्यातील नागडे येथील गणपत आवणकर यांनी आदिवासी चित्र शैलीवर आधारीत ‘वारली’ या नव्या संकल्पनेची भर घातली. याआधी आवणकर यांनी जंगल बॅ्रकेट, ऑल ओव्हर, पूर्ण ब्रॅकेट, लोट्स ब्रॅकेट, मोर ब्रॅकेट, पेशवाई या लाख रुपये किंमतीच्या साडय़ा बनविल्या होत्या. त्यात बांगडी मोर ज्यात एका बांगडीच्या आकारात चार मोर बसविण्याची हातमागावरील अत्यंत अवघड कलाही आवणकरांनी आत्मसात केली आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

नवनवीन करण्याची हौस असलेल्या आवणकरांनी या वारली चित्रशैलीला पैठणीवर साकारण्यासाठी आदिवासी चित्रशैलीचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी डहाणू, नवसारी, जव्हार, पालघर, मोखाडा या सह्य़ाद्रीच्या पूर्व पर्वत रांगांलगतच्या भागात जाऊन चित्रशैलीचा अभ्यास करत शैली अंगीकारली. महिलांनी घराच्या प्रथमदर्शनी भागात तांदळाचे पाणी आणि डिंक यापासून तयार केलेल्या पेजला बांबूच्या काडय़ांपासुन तयार केलेल्या ब्रशचा वापर करत डोंगर, नदी, सुर्य, पाने, फुले यांना अनोख्या शैलीत साकारले आहेत. सुर्य, चंद्रापासून गोल, झाड आणि डोंगराचे प्रतिक त्रिकोणी, जमीन, धार्मिक श्रध्दास्थान म्हणून चौकोन अशा तीन चिन्हाच्या वापरात फक्त पांढऱ्या रंगाच्या मदतीने चित्रे आकारास येतात. या सर्वाचा इतिहास आणि प्रात्यक्षिक जवळून अभ्यास झाल्याने वारलीतील बारकावे त्यांनी हुबेहुब प्रत्यक्षात आणले. रेशीम, जरच्या मदतीने ही कला प्रत्यक्षात येतांना अडचणी आल्या. मात्र, हे आव्हान म्हणून स्विकारल्याने ‘वारली’ आज प्रत्यक्ष पैठणीवर आल्याचा आनंद अधिक असल्याचे आवणकर यांनी सांगितले. सध्या सणासुदीचे दिवस असून महिला वर्गही आता पैठणीतील नव्या प्रयोगांना प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी नमूद केले.