प्राथमिक व विभागीय पातळीवर चाळणी लागत असल्याने ताकतीचा संघ पुढे जाईल..महाविद्यालयीन तरुणाईला यानिमित्ताने चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले. स्थानिक पातळीवर ज्वलंत विषय मांडण्याची संधी मिळाली. ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या या काही प्रतिक्रिया.
न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या शर्वरी तळेकर व स्नेहा आरेकर यांच्या म्हणण्यानुसार या स्पर्धेचा अनुभव अतिशय विलक्षण होता. या स्पर्धेची आम्ही वर्षभर चातकासारखी प्रतीक्षा करतो. दुसरीकडे तयारी सुरू असते. स्पर्धेतून खूप काही शिकायला मिळाले, असे मत शर्वरीने तर नवोदित कलावंतांना प्रोत्साहित करणारी स्पर्धा असल्याचे स्नेहाने नमूद केले. ‘एमईटी’च्या रुचिता कोकाटेने व्यासपीठावर आजवर अनेकदा सादरीकरण केले. तथापि, केवळ परीक्षकांसमोर सादरीकरणाची ही तिची पहिलीच वेळ होती. त्यामुळे आधी थोडी धाकधूक होती. परंतु, पडदा उघडला गेल्यावर धीर येऊन सारेकाही नेटकेपणाने जमल्याचे तिने सांगितले. तयारीला फारसा वेळ मिळाला नसल्याची खंत रुचितासह तिची सहकारी कांचन मोरे यांनी व्यक्त केली.
सिन्नरच्या अंकिता गुजरातीने या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे सांगितले. तिचा सहकारी विजयने स्पर्धेने स्थानिक ज्वलंत विषय मांडण्याची संधी दिल्याचे मांडले. सेझ वा तत्सम विषयाला भाषणातून विरोध केला तर वाद निर्माण होऊ शकतो. परंतु, तो विषय एकांकिकेच्या माध्यमातून मांडून जनजागृती करता येते हे आम्ही दाखवून दिल्याचे त्याचे म्हणणे.
क. का. वाघ महाविद्यालयाचा उर्वराज गायकवाडला राज्यात होणाऱ्या लोकांकिका स्पर्धेतील ही सर्वात चांगली, योग्य व्यवस्थापन असणारी स्पर्धा वाटते. या स्पर्धेमुळे कलाकारांना व्यासपीठ मिळतेच, शिवाय मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होते. गत वर्षीच्या याच स्पर्धेत आमची एकांकिका अंतीम फेरीत गेली होती. त्यावेळी स्पर्धेचे वेगळेपण अनुभवयास मिळाले. याच महाविद्यालयाच्या एकता आढावने कोणाला माहीत नसणारे कलाकार या माध्यमातून पुढे येत असल्याकडे लक्ष वेधले. बीवायके महाविद्यालयाची श्वेता पाटील आणि करिश्मा चव्हाण यांचा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचा हा पहिलाच अनुभव होता. शाळा व महाविद्यालयात कधीकधी सादरीकरण केले होते. पण स्पर्धेत प्रथमच सादरीकरण केल्याचे त्यांनी नमूद केले. ‘दोघी’ या एकांकिकेचे लेखक अतुल महानवर यांनी स्पर्धेच्या व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त करत प्राथमिक फेरीमुळे चांगले विषय आणि ताकतीचे संघ पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला.
केटीएचएमच्या ‘व्हॉटस अॅप’चे लेखक व दिग्दर्शक अदील शेखने स्पर्धेतील गाळण्यांबाबत समाधान व्यक्त केले. राज्यात अनेक ठिकाणी एकांकिका स्पर्धा होतात. परंतु, त्यात एका फेरीतून अंतीमसाठी संघ निवडले जातात. त्यात प्रवेशिका मोठय़ा संख्येने असल्याने परीक्षकही कंटाळण्याची शक्यता असते. ‘लोकसत्ता’च्या स्पर्धेत विभागीय पातळीवर दोन फेरीतून ताकतीचा संघ पुढे जाऊ शकतो. गेल्या स्पर्धेपासून आम्ही यंदाच्या स्पर्धेच्या तयारीला लागल्याचे अदीलने नमूद केले.
नवीन अनुभव देणारी ही स्पर्धा असल्याचे पंचवटी महाविद्यालयाच्या प्रथमेश जाधव आणि सतीश वराडे यांनी नमूद केले.