दोन विद्यार्थिनींची तक्रार

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या पासवर्डचा परस्पर वापर करून गोंधळ घातला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या पासवर्डचा वापर करून परस्पर तिचा प्रवेश रद्द केल्याची घटना घडली. संबंधित जागेवर प्रवेश मिळवण्यासाठी यादीतील कोणी हे उद्योग केले की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे.

या संदर्भात नाशिकरोड येथील सायली थोरात या विद्यार्थिनीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सायलीने अर्ज भरला होता. त्यानुसार तिला पासवर्ड मिळाला. गुणवत्ता यादीत पुण्याच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. सामनगावच्या केंद्रावर जाऊन तिने प्रवेश नक्की केला. प्रवेश प्रक्रिया पूर्णत्वास गेल्याने पुढील तयारीला लागलेल्या सायलीला नंतर धक्का बसला. तिचा पासवर्ड वापरून कोणीतरी तिचा प्रवेश परस्पर रद्द केला.

तिची मैत्रीण कोमल गायकवाड हिलादेखील तसाच अनुभव आला. यामुळे दोघींनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बहुतांश प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडल्या जातात.  विशिष्ट महाविद्यालयात प्रवेश मिळावा, असा विद्यार्थी व पालकांचा आग्रह असतो.   कोणाला प्रवेश मिळणार, संबंधितांचे गुण किती याची माहिती ऑनलाइन सर्वाना पाहावयास मिळत असते. संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्यांपैकी कोणी स्वत:चा प्रवेश नक्की करण्यासाठी हे उद्योग केले असावे, अशी शक्यता व्यक्त होत आहे.