राजीनाम्याच्या तयारीत; जिल्हा रुग्णालय बालमृत्यू प्रकरण

नवजात बालकांच्या मृत्यूमुळे राज्यात उडालेल्या गदारोळामुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ कमालीचे धास्तावले आहेत. बाल मृत्यूला केवळ आपणास  जबाबदार धरले जात असल्याने बालरोग तज्ज्ञ नोकरीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. या घडामोडींचा परिणाम ग्रामीण आरोग्य सेवेवरही झाला. ग्रामीण भागात कार्यरत वैद्यकीय अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.

नवजात बालकांच्या मृत्यूची आकडेवारी समोर आल्यापासून जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांसाठीचा हा कक्ष चर्चेत आला आहे. या कक्षात नेहमी पूर्ण क्षमतेने बालके दाखल होत असतात. मात्र, त्यावर उपचार करण्यासाठी त्या तुलनेत मनुष्यबळ व इनक्युबेटरसह अन्य साधनसामग्रीचा तुटवडा जाणवत असतो.

ही गंभीर बार समोर आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी अकस्मात भेट देत सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी, काँग्रेस व आपच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन बाल मृत्यूला जबाबदार कोण, याची चौकशी करावी म्हणून आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला होता. राजकीय पक्षांकडून आरोग्य विभागाला धारेवर धरण्यात आले. या घडामोडींमुळे  कक्षासह ग्रामीण भागात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खच्चीकरण झाले आहे, असे आरोग्य विभागाची भिस्त सांभाळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात येते.

बालमृत्यूची कारणे लक्षात न घेता वैद्यकीय अधिकाऱ्यांना संशयाच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. ३०० किलोमीटरच्या परिघातून अतिकुपोषित बालके या ठिकाणी दाखल होत असतात. त्याचप्रमाणे महापालिका व खासगी रुग्णालयातूनही अत्यवस्थ बालके जिल्हा रुग्णालयात संदर्भित केली जातात. अकाली जन्मलेली, कमी वजनाची ‘क्रिटिकल इल’ बालके शेवटच्या क्षणी आल्यावर त्यांच्यावर उपचार करणे जिकिरीचे ठरते.

४०० ते ७०० ग्रॅम पर्यंत वजन असणाऱ्या बालकांना वाचविणे अवघड काम असते. दाखल झाल्यानंतर काही तासात त्यांचा मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सद्यस्थितीत नवजात बालकांच्या उपचार कक्षात ५४ बालके उपचार घेत आहेत. संबंधितांनी राजीनामा दिल्यास कक्षाचे कामच अडचणीत येईल. हे लक्षात घेत संबंधितांची समजूत काढली जात असल्याचे रुग्णालय प्रमुखांनी सांगितले.

आरोग्य विभागाची ग्रामीण भागात १०६ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५९२ उपकेंद्र, २३ ग्रामीण रुग्णालय, मालेगाव येथे सामान्य, चार उपजिल्हा आणि एक जिल्हा शासकीय रुग्णालय आहेत. या ठिकाणी कार्यरत वैद्यकीय अधिकारी धास्तावले आहेत. रुग्णावर उपचार करूनही दोष आपल्या माथी मारला जातो. चौकशीही होऊ शकते. यामुळे काम न केलेले बरे अशा मानसिकतेत ही मंडळी वावरत आहे. मुळात ग्रामीण व अतिदुर्गम भागात काम करण्यास डॉक्टर तयार नसतात. ग्रामीण भागातील अनेक पदे आजही रिक्त आहेत. ग्रामीण भागात काम करण्याऐवजी शहरी व निमशहरी भागात खासगी सेवा दिल्यास अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागणार नसल्याची भावना संबंधितांमध्ये बळावल्याचे निरीक्षण आरोग्य सेवेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांने नोंदविले.

बालरोगतज्ज्ञांची नाराजी

एप्रिल ते ऑगस्ट २०१७ या काळात कक्षात एकूण १६२६ बालके दाखल झाली. त्यातील जिल्हा रुग्णालयात जन्मलेली ८६५ तर बाहेरून संदर्भित केलेल्या ७६१ बालकांचा समावेश होता. त्यातील २२७ बालकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी संबंधितांनी दिली. उपचारासाठी बालरोगतज्ज्ञ प्रयत्न करतात. परंतु, प्रामुख्याने वजनाने कमी, श्वसन घेण्यास त्रास होणारी व संसर्ग झालेल्या बालकांना वाचविण्यात यश मिळाले नसल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. शेकडो बालके कक्षात उपचार घेऊन सुखरूप घरी गेली. उपचारात हलगर्जीपणा झाला असता तर सुमारे १४०० बालके बरी कशी झाली असती? त्याचा विचार न करता आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. याबाबत बालरोगतज्ज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी थेट शासकीय नोकरी सोडण्याची तयारी दर्शविली आहे.