‘मापात पाप’ करून ग्राहकांना लुबाडणाऱ्या जिल्ह्यातील संशयास्पद पेट्रोल पंपांवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत शहरातील एका पेट्रोल पंपावरील यंत्रणेत घोळ असल्याचे निष्पन्न झाल्यावर ते सील करण्यात आले. हा पंप एका माजी नगरसेवकाचा असल्याचे सांगितले जाते. इगतपुरीतील एका पंपावर पथकाने छापा टाकला. या कारवाईमुळे पेट्रोल पंपचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठाणे येथील काही पेट्रोल पंपांमध्ये इंधन विक्री करताना इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत घोळ करून कमी पेट्रोल व डिझेल ग्राहकांना देऊन लूटमार केली जात असल्याचे समोर आले होते. इंधन वितरित करणाऱ्या यंत्राच्या तंत्रज्ञांच्या मदतीने पंपमालक हे उद्योग करीत असल्याचे निष्पन्न झाले. तपासात असे प्रकार राज्यात सर्वत्र सुरू असल्याचे लक्षात आल्यावर शासनाने ठाणे गुन्हे शाखेला संशयास्पद वाटणाऱ्या पंपांची तपासणी करून कारवाईचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री शहर व ग्रामीण भागातील काही पेट्रोल पंपांची तपासणी केली. त्यात त्र्यंबक नाका चौफुलीलगतच्या पेट्रोल पंपावर एका यंत्रात घोळ असल्याचे निदर्शनास आले. लिटरमागे ३० मिलीलीटर इंधन कमी दिले जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या पंपावर इंधन वितरणासाठी सहा यंत्रणा कार्यान्वित होत्या. त्या सर्वाची तपासणी केल्यावर एका यंत्रात हा घोळ दिसून आला. ते यंत्र सील करण्यात आले आहे. अतिशय जुना हा पंप असून अलीकडेच तो एका माजी नगरसेवकाने खरेदी केल्याचे सांगितले जाते. अतिशय मोक्याच्या जागेवरील पंपावर वाहनधारकांची मोठी रांग लागलेली असते. याच ठिकाणी असे प्रकार होत असल्याची चर्चा सुरू झाल्यावर वाहनधारकांनाही धक्का बसला. इगतपुरीतील पेट्रोल पंपावर रात्री पथकाने छापा टाकला. या ठिकाणी अद्याप तपासणी सुरू असून काही घोळ आहे किंवा नाही याची स्पष्टता झालेली नाही. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यंत्रणेत तांत्रिक फेरबदल करीत हे प्रकार केले जातात. त्यात तंत्रज्ञ आणि काही चालकांची मिलीभगत असल्याची वदंता आहे. या प्रकारात अखेर ग्राहकरूपी वाहनधारक नाडले जातात. दरम्यान, पेट्रोल चालकांमध्ये चुकीचे काम करणारे कोणी असेल तर, संबंधितांवर कारवाई व्हायला हवी, असे पेट्रोलपंपधारकांच्या संघटनेने म्हटले आहे.

तथापि, अशी कारवाई करताना संबंधित पंपावरील विक्री बंद ठेवणे अयोग्य ठरेल. तपासणीचा अहवाल येण्यास दहा ते बारा दिवसांचा कालावधी जातो. अहवालात कोणताही दोष नसल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित चालकाची बदनामी होण्याची शक्यता असते. इंधन विक्रीचा व्यवसाय विश्वासावर चालतो. पंप बंद राहिल्यास विश्वासार्हता गमाविण्याचा धोका असतो. यामुळे तपासणी झाल्यावर संबंधित पंपावरील विक्री बंद केली जाऊ नये, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.

रिडिंग ० आणि मोजावे लागले ४०० रुपये

पेट्रोल पंपावरील यंत्राबाबत ग्राहकांचे अनुभवही फारसे चांगले नाहीत. गंगापूर रस्त्यावरील सावरकरनगरलगतच्या पंपावर वाहनधारकाने चारचाकी वाहनाची टाकी पूर्णपणे भरण्यास सांगितली. चार ते पाच सेकंदात इंधन भरले गेल्यावर यंत्र अकस्मात थांबले व पुढे जाणारे काटे शून्यावर आले. या काळात टाकीत किती इंधन भरले गेले, याची स्पष्टता झाली नाही. पंपावरील कर्मचाऱ्यांनी ४०० रुपयांचे इंधन भरल्याचे सांगत पैशांची मागणी केली. यंत्र अकस्मात बंद कसे पडले याबद्दल वाहनधारकाने विचारणा केल्यावर कर्मचाऱ्यांनी थातुरमातुर उत्तरे देत वेळ मारून नेली. शिवाय, ग्राहकाकडून ४०० रुपये वसूल केले. टाकीत खरे इंधन किती भरले गेले, याची अखेपर्यंत स्पष्टता झाली नाही.

)((     नाशिक शहरात पेट्रोल पंपावरील सील केलेली यंत्रणा.  )))