स्वच्छ भारत अभियानांतर्गत सप्तश्रृंग गड प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने विशेष स्वच्छता मोहिम हाती घेतली असून तिचा शुभारंभ बुधवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. गडावर संकलीत केल्या जाणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यावर नाशिक महापालिकेच्या मदतीने प्रक्रिया करता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविले आहे. प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर केला जावा याकरीता ग्रामपंचायतीने १५ हजार पिशव्या आणि ५० कचरा कुंडय़ांचे वितरण केले. सप्तश्रृंगी देवस्थानही प्रसादाचे लाडू विघटनशील कागदात देणार आहे. सप्तश्रृंग गड प्लास्टिकमुक्त करून राज्यातील आदर्श पर्यटनस्थळ करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी पं.स.सभापती आशा पवार, तहसीलदार कैलास चावडे, देवस्थानचे विश्वस्त नाना सूर्यवंशी, पं.स.सदस्य पल्लवी देवरे, सरपंच सुमन सूर्यवंशी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व्यावसायिकांना कापडी पिशव्या आणि कचरा कुंडय़ांचे वाटप करण्यात आले. राधाकृष्णन आणि शंभरकर यांनी स्वत: स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. स्त्री शक्ती महिला बचत गटातर्फे प्रत्येक स्टॉलवर प्लास्टिकमुक्तीचा संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच बचत गटाने ग्रामपंचायतीला ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर कापडी पिशव्या तयार करून दिल्या आहेत. माजी उपसरपंच संदीप बेनके यांनी पाच हजार कापडी पिशव्या मोहिमेसाठी भेट दिल्या. ग्रामपंचायतीतर्फे १५ हजार पिशव्या आणि ५० कचरा कुंडय़ांचे वाटप करण्यात आले. व्यावसायिकांना प्लास्टिक न वापरण्याबाबत आवाहन करण्यात आले. प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

दरम्यान, स्वच्छता मोहिमेसाठी गडावर सहा भागात स्वतंत्र पथके नेमण्यात आले. पथकात अधिकारी, कर्मचारी, नागरिक सहभागी होते. त्यांनी ठिकठिकाणचा प्लास्टिक कचरा संकलीत केला. तीन ट्रॅक्टर आणि एका घंटागाडीद्वारे तो नेण्याची व्यवस्था करण्यात आली. उद्योजक आणि व्यावसायिकांनी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य आणि सौंदर्य कायम राखण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमात सहभागी होऊन कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले.

प्लास्टिक पिशव्यांना बंदी

सप्तश्रृंगी गड राज्यातील आदर्श पर्यटनस्थळ व्हावे यासाठी ग्रामपंचायत आणि सप्तश्रृंग निवासीनी देवस्थानने एकत्रितपणे प्लास्टिक मुक्तीची मोहीम राबवावी आणि महिन्यातील एक दिवस निश्चित करून त्या दिवशी नागरिकांच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा एकत्रित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले. प्लास्टिक एकत्र करून नाशिक महापालिकेला प्रक्रियेसाठी देणे शक्य होईल. महापालिका, जिल्हा परिषद आणि प्रशासन यात सामंजस्य करार करून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देता येईल. नागरिकांनी प्लास्टिकबंदी मोहीम यशस्वीपणे राबविल्यास गडाचा परिसर सुशोभिकरणासाठी प्रशासनाकडून सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शंभरकर यांनी भाविकांना आकर्षित करण्यासाठी आणि गडाचे पावित्र्य राखण्यासाठी प्लास्टिकवर पूर्णत: बंदी आवश्यक असल्याचे सांगितले. सर्वानी प्रयत्न केल्यास गड प्लास्टिकमुक्त होईल आणि त्यातून चांगला संदेश पर्यटकांपर्यंत जाईल, असे ते म्हणाले. सूर्यवंशी यांनी देवस्थान प्रसादाचे लाडू विघटनशील कागदात देईल असे सांगितले. भक्तांनाही गडावर प्लास्टिक पिशव्या नेण्यास अनुमती दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.