सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या आणि उपद्रवी घटकांविरोधात शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ -२ अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खास मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत चायनीज गाडय़ांवर कारवाई करतानाच १७ टवाळखोरांना पकडण्यात आले.
गेल्या काही महिन्यात शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. त्या अनुषंगाने पोलीस कारवाई करत असले तरी गुन्हेगारी नियंत्रणात आल्याचे दिसत नाही. प्रमुख रस्ते व अंतर्गत भागात ठिकठिकाणी चाजनीज गाडय़ा व खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी सायंकाळनंतर मद्यपान करत टवाळखोर धुडगूस घालत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात होत्या. त्याची दखल घेत पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत पोलीस ठाण्यात मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ गुन्हे दाखल करण्यात आले. तर अंबड पोलीस ठाणे ४, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६, मुंबई पोलीस कायद्यान्वये ३, उपनगर पोलिसांनी ५ गुन्हे दाखल केले आहेत. नाशिकरोड पोलिसांनी १९ गुन्हे दाखल केले आहेत. उपनगर पोलिसांनी एकुण १७ टवाळखोरांवर कारवाई केली. रस्त्यावर चायनिज पदार्थाची विक्री करणाऱ्या सात हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली. या गाडय़ांवर सायंकाळी व रात्रीच्या सुमारास मद्यपींची मोठी गर्दी असते. या ठिकाणांचा वापर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांकडून केला जातो.