नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात वर्दळीच्या ठिकाणांवर पाळत ठेवून मोटरसायकल चोरीचे प्रमाण सध्या वाढले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुनील धांडगे या सराईत गुन्हेगारास रंगेहात पकडले. त्याच्याकडून एकूण ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून या मुद्देमालाची किंमत ३ लाख ८० हजार रुपये इतकी आहे.

शहरातील मोटारसायकल चोरीच्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना गोपनीय माहिती मिळाली. मालेगाव नवीन बस स्थानकाच्या परिसरात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील गुन्हेगार मोटारसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे त्यांना समजले. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव येथील नवीन बस स्थानक परिसरात सापळा रचून सुनील पुंजाजी धांडगे उर्फ अकील शहा फत्तु शहा, (वय ३५, रा. वरखेडी, ता. पाचोरा, जि. जळगाव) यास ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीमध्ये आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. साथीदार रोहित सुतार (रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) आणि संदीप पाटील (रा. कल्याण पूर्व) यांच्यासह एक वर्षांपूर्वी मालेगाव कॅम्प, छावणी, सोयगाव परिसरातून ९ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. तसेच या मोटार सायकली विक्री करण्यासाठी वरखेडी या गावी घराच्या बाजूला ठेवल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी सुनीलला वरखेडी गावातून लपवून ठेवलेल्या ९ मोटर सायकली पोलिसांनी जप्त केल्या.