नाशिकमध्ये पुन्हा एकदा पोलिसांचा दबदबा

गुन्हेगारी घटनांमुळे आजवर नाशिककरांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेली पोलीस यंत्रणा महिनाभरापासून चांगलीच सक्रिय झाल्याने आता नागरिकांचा पाठिंबाही मिळवू लागली आहे. गुन्हेगारांचे कंबरडे मोडले जात असल्याने पोलिसांचा दबदबा निर्माण होऊ लागल्याचे आशादायक चित्र आहे. रिपाइं नगरसेवकापासून ते गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित साथीदारांपर्यंतच्या मंडळींवर कारवाई करत बाहुबलींची दहशत संपविण्याकडे यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरभर विखुरलेल्या गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांना राजाश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिल्यामुळे गुन्हेगारांच्या सोडवणुकीसाठी एरवी होणारा राजकीय हस्तक्षेप कमी झाला आहे. पोलिसांच्या धडक कारवाईचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत असून ही कारवाई केवळ काही दिवसांपुरतीच असल्याचे ठरू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

वाहनांची जाळपोळ, खून, टवाळखोरांचा धुडगूस, दागिने खेचून नेणे.. आदी घटनांची मालिका अव्याहतपणे सुरू असल्याने काही महिन्यांपूर्वी नाशिकची वाटचाल पुन्हा एकदा गुन्हेगारांचे शहर अशी होत असल्याची प्रतिक्रिया उमटत होती. काही वर्षांपूर्वीदेखील ही स्थिती निर्माण झाली होती. मध्यंतरीच्या काळात थंडावलेल्या गुन्हेगारी घटनांनी गेल्या काही महिन्यांत पुन्हा डोके वर काढल्याने त्याची पुनरावृत्ती होऊ लागली. या घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्याने ही विचित्र स्थिती निर्माण झाल्याची सर्वसामान्यांची भावना बनली. यामुळे नाशिकमध्ये पोलिसांचे राज्य आहे की गुन्हेगारांचे, असा प्रश्न नागरिक आणि राजकीय पक्षांनी उपस्थित केला. पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी होऊ लागली. सर्व घटकांनी यंत्रणेला जबाबदार धरल्यानंतर पोलीस खऱ्या अर्थाने सक्रिय झाले. तेव्हापासून सुरू झालेल्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यातून राजकीय प्रभृतींची सुटका झाली नाही.

आजवर राजकीय मंडळींवर पोलीस कारवाई अपवादाने होत असे; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. न्यायालयाच्या आवारात संशयितांना पाण्याच्या बाटलीतून मद्य देणारा रिपाइं नगरसेवक प्रकाश लोंढेला पोलिसांनी सोडले नाही. पोलीस कोठडीदरम्यान या नगरसेवकाला घर व परिसरात चौकशीसाठी फिरवत सूचक संदेश दिला. याच नगरसेवकाचा मुलगा आणि पी. एल. ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे दुहेरी हत्येच्या प्रकरणात फरार आहे.

वेगवेगळ्या भागांत गुन्हेगारांच्या विविध टोळ्या सक्रिय आहेत. काही टोळ्यांना राजकीय आश्रयही लाभला आहे. तडीपार गुंडाला आपल्या संपर्क कार्यालयात आश्रय देणारा नाशिक रोड भागातील अपक्ष नगरसेवक पवन पवारविरुद्ध कारवाई केली गेली. अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचे लक्षात घेऊन असे अड्डे उद्ध्वस्त करण्याची कारवाई लगोलग सुरू झाली. झोपडपट्टीसह महापालिकेची मोकळी मैदाने वा बगिचा आणि रहिवासी भागात टवाळखोरी करणारे, मद्यपी यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. रात्रीच्या सुमारास सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या मोहिमांमुळे गुन्हेगारांचा शोध, टवाळखोरांवर कारवाई, मद्यपान करून वाहन चालविणारे चालक अशा साऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला गेला.

गुन्हेगारी टोळ्यांचा ज्या भागात दबदबा आहे, त्याच परिसरात त्यांची वरात काढून या टोळ्यांची दहशत संपविली जात आहे. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि श्रीकांत धिवरे यांनी वेगवेगळ्या भागांत गुंडांची धिंड काढली.

चांगले टोळीच्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे गावठी कट्टा, चॉपर, मिरचीची पूड असे साहित्य मिळाले. या संशयितांची त्यांचा दबदबा असलेल्या अशोकस्तंभ व रविवार कारंजा भागात, तर टिप्पर गँगच्या गुंडांची सिडकोत वरात काढण्यात आली. या घडामोडींमुळे शहरात पोलिसांचा दबदबा निर्माण होण्यास हातभार लागला. एरवी, अनेक भागांत टोळ्यांची इतकी दहशत आहे की, नागरिक भीतीपोटी तक्रारही करत नाही.

गुन्हेगारांच्या सुटकेसाठी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जातात. गुन्हेगारांशी लागेबांधे ठेवणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले गेल्यामुळे कारवाईचे सत्र सुरू असताना राजकीय पदाधिकारी त्यांच्या सोडवणुकीसाठी पुढे आलेले नाही, हे विशेष.

गुन्हेगारांच्या सोडवणुकीसाठी राजकीय हस्तक्षेप नाही

धडक मोहीम राबवत पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या काळात रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह तडीपार गुंड, गुन्हेगारी पाश्र्वभूमीची मंडळी आदींवर कारवाईचे सत्र सुरू आहे. गुन्हेगारांवर कारवाई झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी वा नेत्याने संशयितांच्या सोडवणुकीसाठी संपर्क साधला नाही वा हस्तक्षेप केलेला नाही.

– श्रीकांत धिवरे आणि लक्ष्मीकांत पाटील (पोलीस उपायुक्त)