त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव प्रकरणाचे पडसाद शहरात उमटू लागल्यावर त्याचा लाभ घेत समाजकंटकांनी सुरू केलेली कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी कठोरपणे नेस्तनाबूत केली. आयुक्तांच्या या कारवाईचे नाशिककरांकडून स्वागत होत असताना दुसरीकडे शहर व परिसरातील गुन्हेगारी रोखण्यात आयुक्तांना अजूनही फारसे यश आले नसल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस चोरी, घरफोडी, लूट असे प्रकार सुरूच असून हे प्रकार रोखण्यात तसेच घरफोडी, चोऱ्यांचा तपास लावण्यातही पोलिसांना अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

एस. जगन्नाथन यांच्यानंतर पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारलेले डॉ. सिंघल यांनी नाशिकमध्ये तळेगाव प्रकरणाचे लोण पसरून गुंडांनी त्याचा फायदा घेऊ नये म्हणून अत्यंत यशस्वीपणे कार्यवाही केली. भल्याभल्या गुंडांना पोलिसांनी चोप दिल्याने नाशिककरांकडून या कार्यवाहीचे निश्चितपणे स्वागत झाले. पोलिसांनी यापुढेही कोणाचाही मुलाहिजा न बाळगता तसेच कोणताही राजकीय दबाव न स्वीकारता कठोर कार्यवाही केल्यास शहरातील गुन्हेगारीस आळा बसेल, अशी प्रतिक्रियाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या सकारात्मक भावनेचा लाभ घेऊन पोलिसांनी समाजकंटक, गुंड, गुन्हेगारीशी संबंधित राजकारणी यांच्याविरुद्धच्या कारवाईस वेग देण्याची गरज असताना मागील काही दिवसांत चोऱ्या, लूट, घरफोडी यांसारख्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. दिवाळीत चाकरमाने आपआपल्या गावांना परतत असल्याने सिडको, सातपूर, अंबड या कामगारांचा भरणा असलेल्या वसाहतींसह इतरत्र बहुतेक घरांना कुलूप असते. कुलूपबंद घरांचा फायदा चोरटय़ांकडून घेण्यात येत असल्याचे प्रत्येक दिवाळीत दिसून येते. त्यामुळेच सध्याच्या गुन्हेगारीत दिवाळीत अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिडको, सातपूर भागातील अनेक घरफोडय़ांचा तपास अद्याप लागलेला नसताना इतर किरकोळ चोऱ्यांच्या तपासाकडे पोलिसांकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

मागील काही दिवसांपासून विविध समाजाचे मोर्चे, मंत्र्यांचे दौरे, तळेगावची घटना यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण निश्चितपणे वाढला आहे. डॉ. सिंघल यांनी पोलिसांवरील हा ताण लक्षात घेऊन त्यांना मानसिकदृष्टय़ा सक्षम कसे करता येईल, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. अलीकडेच मल्टिप्लेक्समध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना चित्रपट दाखविण्याची योजना त्याचाच एक भाग होता. याआधीही पोलिसांच्या आरोग्यासाठी आयुक्तांनी उपक्रम आखले. आयुक्तांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे अशा प्रकारे लक्ष देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असला तरी गुन्हेगारीविरुद्ध पोलिसांनी दक्ष राहण्यासंदर्भातही त्यांनी वाढत्या चोऱ्या आणि घरफोडय़ा पाहता निर्देश देण्याची गरज आहे. गुन्हेगारी रोखण्याप्रमाणेच ज्यांची नोंद झाली आहे अशा गुन्ह्य़ांचा तपासही लागत नसल्याने तक्रारकर्तेही हैराण झाले आहेत. पोलीस ठाण्यात तक्रारकर्ते आपल्या तक्रारीचा तपास कुठपर्यंत आला आहे, याची चौकशी करण्यास गेले असता ‘तपास सुरू आहे’ इतकेच उत्तर दिले जाते.