तीन जणांना अटक
पंचवटीतील सीता गुंफा या प्राचीन मंदिरात सोमवारी सुटय़ा पैशांवरून भाविकांशी झालेल्या वादाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकास मंदिराची व्यवस्था सांभाळणाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
काळाराम मंदिराच्या शेजारी सीता गुंफा हे मंदिर आहे.
देवदर्शनासाठी आलेले भाविक आवर्जून या मंदिरात भेट देतात. या ठिकाणी मंदिराची व्यवस्था सांभाळणाऱ्यांकडून प्रति व्यक्ती एक रुपया शुल्क आकारले जाते. सोमवारी सकाळी मध्य प्रदेशातील ४० ते ५० भाविक दर्शनासाठी आले होते.
उपरोक्त भाविकांमधील एकाकडे सुटे पैसे नसल्यावरून व्यवस्था सांभाळणाऱ्यांनी त्यास मारहाण केली. यामुळे संतप्त भाविक पंचवटी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी आपली कैफियत मांडली. त्यानंतर पोलीस अधिकारी दिनेश मुळे व दोन हवालदार काही भाविकांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले.
मंदिराची व्यवस्था सांभाळणारे हिमांशू उदयपुरी गोसावी, गोरख नामदेव भुरक व योगेंद्र उदयपुरी गोसावी यांना पोलीस ठाण्यात येण्याचे सूचित केले. तथापि, हे संशयित पोलीस पथकाच्या अंगावर धावून गेले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी धक्काबुक्कीही केली.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी जादा कुमक मागवून घेतली आणि हिमांशू, गोरख व योगेंद्र यांना ताब्यात घेतले
. या तीन जणांविरुद्ध भाविकांकडून शस्त्राचा धाक दाखवून बळजबरीने पैसे घेणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.