सेवानिवृत्तीस अवघे सहा महिने बाकी असताना येथील पोलीस आयुक्तालयात कार्यरत सहाय्यक आयुक्त शालिग्राम पाटील (५८) यांचा रविवारी सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलावात पोहत असताना मृत्यू झाला.

दोन महिन्यांपूर्वी पाटील यांची नाशिक येथे बदली झाली होती. ते पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय विभागाची जबाबदारी सांभाळत होते. पोहण्याची आवड असलेल्या पाटील यांच्या पोहण्यात काही दिवसांपासून खंड पडला होता. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ते स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलावात पोहण्यासाठी उतरल्यावर काही क्षणातच त्यांची हालचाल मंद झाली. उपस्थित जलतरणपटू आणि पोलीस कर्मचाऱ्यांना त्यावेळी पाटील हे पाण्यातील व्यायाम करत असावेत असे वाटले. परंतु, थोडय़ा वेळात त्यांचे शरीर खाली जाऊ लागल्यावर उपस्थितांनी त्यांना लगेच तलावाबाहेर काढले. त्यांना त्यांच्याच वाहनातून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पाटील यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. डॉक्टरांनी हृदयविकाराने पाटील यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले. पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कृषी पदवीधर असलेल्या पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आहेत.