नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिकमधील काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार आणि पक्षाचे चिन्ह असलेल्या चिठ्ठयांवर मतदान केंद्र, नाव, मतदान केंद्राचा क्रमांक, यादी भाग क्रमांक अशी माहिती लिहून देत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.

नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, जुने नाशिक, सिडको या भागात अशा अनेक घटना घडल्या आहेत. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच मतदान केंद्राच्या दोनशे मीटर अंतरावर मतदारयाद्या घेऊन बसलेल्या विविध पक्षीय उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी झडती घेतली. यामध्ये राजकिय पक्ष, चिन्ह, उमेदवारांची नावे असलेल्या चिठ्ठया पोलिसांनी जप्त केल्या.

 

मतदारयाद्या घेऊन बसलेले विविध पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे असणाऱ्या चिठ्ठया मतदारांच्या हाती देऊन ‘आमच्या पक्षातील उमेदवाराकडे लक्ष ठेवा’ अशी सूचना करत होते. शहर परिसरात बहुतांश ठिकाणी ही परिस्थिती होती. काहींनी पारंपारिक चिठ्ठी पद्धतीला फाटा देऊन इलेक्ट्रॉनिक प्रिंट मशीनद्वारे उमेदवाराचा तपशील व मतदाराची माहिती याची सांगड घालत चिठ्ठी देण्याचे काम केले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी ३ मशीन्स जप्त केल्या. तसेच मतदान केंद्रांवर फिरणाऱ्या कार्यकर्त्याची झडती घेतली घेऊन ११ मोबाईल जप्त केले. यातील काही जण मतदान केंद्र परिसरात मोबाईलद्वारे चित्रीकरण करताना आढळून आले. या सर्वांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.