लांब उडी कुठपर्यंत गेली तसेच फेकलेला गोळा किती अंतरावर गेला, याचे प्रत्येकास मोजून दाखविले जाणारे अंतर असो की वजन, उंची वा तत्सम बाबींच्या नोंदींची लगेच दिली जाणारी माहिती असो.. इतकेच नव्हे, तर ही माहिती दिल्यानंतर प्रत्येक उमेदवाराची नोंदवहीत घेतली जाणारी स्वाक्षरी असो वा सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे या प्रक्रियेवर ठेवलेली नजर असो.. पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत ‘पारदर्शकता’ आणण्याचा हा प्रयत्न उमेदवारांना सुखद धक्का देणारा ठरला. शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेस बुधवारी सुरुवात झाली.

शहर पोलीस दलात शिपाई पदाच्या ७९ आणि बॅण्ड पथकातील १८ जागांसाठी १४ हजार २२० तर नाशिक ग्रामीण पोलीस दलात ७२ जागांसाठी ११ हजार २९० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पदांच्या तुलनेत प्राप्त झालेल्या अर्जाची प्रचंड संख्या बेरोजगारीचे प्रमाण दर्शवित आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. शहर व ग्रामीण पोलीस या दोन्ही ठिकाणच्या भरती प्रक्रियेला पहाटेच धावण्याच्या चाचणीद्वारे सुरुवात झाली. ऑनलाइन अर्ज भरणाऱ्या एक हजार उमेदवारांना पहिल्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले. या प्रक्रियेत कागदपत्रे तपासणी व पडताळीस फाटा देऊन उमेदवारांना थेट मैदानात उतरवण्यात आले. शहर पोलिसांनी धावण्याची चाचणी गंगापूर रस्त्यावरील शहीद अरुण चित्ते पुलापासून हॉटेल मिर्चीपर्यंत या मार्गावर तर ग्रामीण पोलिसांनी आडगाव मुख्यालयाच्या मैदानावर चाचणी घेतली. पुरूष उमेदवारांना १६०० मीटर तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटरचे अंतर निश्चित करण्यात आले. शहरातील उपरोक्त मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. मैदानी खेळांची चाचणी पोलीस कवायत मैदानावर पार पडली. त्या अंतर्गत प्रथम वजन, उंची यांचे मोजमाप झाल्यावर गोळा फेक, लांब उडी, पुलअप्सची चाचणी घेतली गेली. प्रत्येक क्रीडा प्रकारात विहित निकषानुसार कामगिरीनिहाय कसे गुण दिले जातील, याचीही माहिती आधीच जाहीर करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणेची नजर ठेवण्यात आली.

मैदानात चाचणीनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची कामगिरी निदर्शनास आणून दिली जात होती. म्हणजे उमेदवाराची लांब उडी किती अंतरापर्यंत गेली, गोळा किती अंतरावर फेकला गेला, याचे मोजमाप उमेदवाराला लगेच दर्शविले जात होते.

चाचणी झालेल्या उमेदवारास त्याची माहिती देऊन नोंदवहीत स्वाक्षरी घेण्यात आली. मैदानी चाचणीबाबत नंतर कोणी आक्षेप घेऊ नये याकरिता ही दक्षता घेण्यात आल्याचे सांगितले जाते. सध्या उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. रणरणत्या उन्हात चाचणी देणाऱ्या उमेदवारांसह त्याचे परीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा कस लागला आहे.