कोंडीतून सुटकेसाठी आणखी एक प्रयत्न

शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाची बांधणी झाल्यापासून काही दिवस बंद करावा लागलेला इंदिरानगरचा बोगदा पुन्हा एकदा नवीन प्रयोगासाठी सिध्द झाला आहे. या बोगद्यातील वाहतुकीत पोलिसांनी फेरबदल केले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

महामार्गाची उभारणी झाल्यापासून इंदिरानगरचा हा बोगदा वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या ठिकाणी आजवर अनेकदा नवनवीन प्रयोग केले गेले. तथापि, ते यशस्वी होऊ शकले नाही. प्रारंभीच्या काळात हा बोगदा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ये-जा करण्यास खुला होता. त्यामुळे या चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत असे. त्यावर सिग्नल व्यवस्थेचा तोडगा काढला गेला. मात्र, काही केल्या कोंडी फुटू शकली नाही.  त्यामुळे वैतागलेल्या वाहतूक पोलिसांनी या बोगद्यातील वाहतूक बंद केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटले. स्थानिकांना ये-जा करण्यासाठी हा सोयीस्कर मार्ग असल्याने तो खुला ठेवण्याची मागणी होऊ लागली. त्यावरून काही आंदोलनेही झाली. बोगद्यासह उड्डाण पुलाशी निगडीत वाहतुकीचा तिढा सोडविण्यासाठी गतवर्षी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या पथकाने सर्वेक्षण करून अभ्यास केला. काही उपायही सुचविले. या घडामोडी घडल्यानंतर वाहतुकीसाठी बोगदा खुला करताना काही निकष निश्चित करण्यात आले. असे सारे काही करूनही बोगदा व परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका झाली नाही. यामुळे बोगद्यातील वाहतुकीबाबत नव्याने बदल करण्यात आले आहेत.

वाहतुकीत फेरबदल

राजमाता पॉइंटजवळील उड्डाण पुलाच्या बोगदा परिसरात वाहतुकीची नेहमीच कोंडी असते. तसेच गंभीर व किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात. या भागातील वाहतूक सुरक्षीत व सुरळीत होण्यासाठी गोविंदनगरकडून राजमाता पॉइंटकडून इंदिरानगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बोगद्यातून जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ही वाहने बोगद्याऐवजी डाव्या बाजूस वळून पुढे उड्डाण पुलाखालील १७१ क्रमांकाच्या जवळून उजवीकडे वळून इंदिरानगर, पाथर्डी फाटा, मुंबईकडे जातील. मुंबई, अंबडकडून येणाऱ्या वाहनांना बोगद्यातून जाता येणार नाही. त्यांनाही सरळ पुढे जाऊन १७१ क्रमांकाच्या खांबाजवळून उजवीकडे वळून इंदिरानगकडे जावे लागेल. इंदिरानगरकडून येणारी वाहने या बोगद्यातून राजमाता पॉइंट, गोविंदनगर, तिडको कॉलनी, मुंबई नाक्याच्या दिशेने जातील. मुंबई नाक्याकडून येणारी वाहने बोगद्यातून इतरत्र जाऊ शकतील. मुंबई नाका ते लेखानगर आणि लेखानगर ते मुंबई नाका हे दोन्हीही सव्‍‌र्हिस रोड दुहेरी वाहतुकीसाठी खुले राहतील, असे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी म्हटले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून पुढील अधिसूचना येईपर्यंत ती अस्तित्वात राहणार आहे.