अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करीत नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, त्यांना तक्रारी करता याव्यात, यासाठी पोलिसांनी ‘ऑनलाइन’चाही पर्याय नागरिकांना उपलब्ध करून दिला आहे. मात्र या पर्यायाने काही प्रकरणात पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कारण, ऑनलाइन तक्रारीत तक्रारदार प्रत्यक्ष समोर येत नाही. कारवाईचाही ऑनलाइन पाठपुरावा घेतला जातो. मूळ नाशिकच्या पण सध्या दुबईत असणाऱ्या एका विवाहितेच्या या स्वरूपाच्या ऑनलाइन तक्रारी पोलीस यंत्रणेची परीक्षा पाहणारी ठरली आहे.

नाशिक-पुणे रस्त्यावरील फेम थिएटर मागील प्रभु कॅपिटल परिसरात राहणाऱ्या पूनम कोहक यांनी २०१६ मध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सासरच्या मंडळींनी मालमत्तेच्या वादातून जीवघेणा हल्ला केला, आपल्यासह माहेरच्या लोकांना गुंडांच्या नावे धमकावले. या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. दरम्यानच्या काळात पतीसह विवाहितेने दुबई गाठले. पुढील काळात सासरच्या मंडळींनी त्यांचे राहते घर बळकावत त्या ठिकाणी अनधिकृत व्यवसाय सुरू केल्याची तक्रार केली. या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधून राहते घर मिळवून द्यावे आणि दोषींवर कारवाई करावी, याचा ऑनलाइन पाठपुरावा त्यांनी सुरू केला. त्याकरिता पोलीस निरीक्षकापासून ते पोलीस आयुक्तांपर्यंत सर्वाकडे तक्रारी मांडल्या. इतकेच नव्हे तर, महिला आयोगाकडे ऑनलाइन तक्रार केली. मात्र कोणीही दखल घेतली नसल्याची संबंधित विवाहितेची तक्रार आहे.

पोलीस केवळ देखावा करीत असून आपल्यासह पतीवर हे प्रकरण बंद करण्यासाठी दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. दरम्यान, या विषयी पोलिसांशी संपर्क साधला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण कौटुंबिक असून त्यात पोलीस हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, ऑनलाइन तक्रारीची सुविधा देण्यामागे नागरिकांच्या सुविधेचा विचार केला आहे. नागरिक ऑनलाइन तक्रार करून त्याच पद्धतीने तिचा पाठपुरावा करू लागले तर संबंधित तक्रारदार कोण, त्याची विश्वासार्हता असे अनेक मुद्दे अनुत्तरित राहू शकतात. या प्रकरणात तसेच काहीसे घडत असल्याचे दिसते.

लोकांना घराबाहेर काढणे पोलिसांचे काम नाही

संबंधित विवाहितेची सासरच्या मंडळींना घराबाहेर काढा अशी मागणी आहे. वास्तविक, कोणाला घराबाहेर काढणे हे पोलिसांचे काम नाही. त्यांचे सासु-सासरे ज्येष्ठ नागरिक असून ते अंथरुणाला खिळून आहेत. ते काय अत्याचार करतील? खरी परिस्थिती त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात येते. संबंधित महिलेने थेट पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करावी. त्यांच्यामार्फत विनाकारण समाजमाध्यमांचा वापर करत दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे.

– डॉ. रवींद्र सिंगल (पोलीस आयुक्त नाशिक)