साहित्य वर्तुळात राजकीय मंडळींचा वावर तसा नवीन नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्याचा प्रत्यय रसिकजन नेहमीच घेतात. १७७ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिकने देखील बहुधा हीच परंपरा जोपासण्याचे ठरवले आहे. दिग्गज साहित्यिकांचा सहवास लाभलेल्या संस्थेला ५० व्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यात राजकीय मंडळींना मानाचे स्थान देण्याचा आवरला न गेलेला मोह त्याची साक्ष देत आहे. हे कार्यक्रम पत्रिकेवरून दिसून येते आहे.

अतिशय गौरवशाली परंपरा लाभलेली ‘सावाना’ संस्था नाशिकचे वैभव म्हणून ओळखली जाते. संस्थेच्या जडणघडणीत कुसुमाग्रज, डॉ. अ. वा. वर्टी अशा अनेक दिग्गज साहित्यिकांचा हातभार लागला. साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठा लाभलेल्या संस्थेच्या कार्यात सहभागी होण्याकरिता अनेकांची धडपड असते. त्यातूनच गेल्या काही वर्षांत संस्थेत राजकारणाचाही शिरकाव झाल्याचे शहरवासीयांना ज्ञात आहे. त्याचे ठळक प्रतिबिंब सुवर्णमहोत्सवी साहित्यिक मेळाव्यात प्रत्यक्ष राजकीय मंडळींच्या सहभागाने उमटणार आहे. खरे तर साहित्यापासून कोणतेही क्षेत्र दूर राहू शकत नाही. साहित्यिकांचा सहवास राजकीय मंडळींना हवाहवासा वाटतो. साहित्याशी नाळ जोडलेले काही स्थानिक मान्यवर राजकीय क्षेत्रातही मुशाफिरी करीत आहे. राजकीय क्षेत्रात आपली कार्यक्षमता सिद्ध करणाऱ्या लोकप्रतिनिधींना खुद्द सावाना कार्यक्षम आमदार पुरस्काराने सन्मानित करते. राजकारण आणि साहित्य यांना एकत्रित गुंफण्याची शृंखला कार्यकारी मंडळाने मेळाव्याचे औचित्य साधून अधिक विस्तारली आहे.

२३ व २४ सप्टेंबर रोजी आयोजित साहित्य मेळाव्यात सहभागी होणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये साहित्यिक कमी अन् राजकीय मंडळी अधिक असल्याचे लक्षात येते.

मेळाव्याचे उद्घाटन नाम फाऊंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. दोनदिवसीय विविध कार्यक्रमांत नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे, लेखक योगेश सोमण, संमेलनाचे अध्यक्ष दत्ता पाटील, कवयित्री रेखा भांडारे, कवी संजय जोशी, समीक्षक मंदार भारदे, साहित्यिक डॉ. राजेंद्र मलोसे, चंद्रकात महामिने, भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचा सहभाग राहील. साहित्याशी संबंधित मंडळींच्या तुलनेत मेळाव्यात राजकीय मंडळींचा अधिक प्रभाव राहणार असल्याचे पाहावयास मिळते.

ग्रंथदिंडीचे उद्घाटन आ. प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते होणार आहे. वाचनालयास त्या प्राध्यापिका असल्याचा पत्रिकेत विसर पडला. मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यास नाशिकचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते गिरीश महाजन, शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर रंजना भानसी, खा. हेमंत गोडसे, आ. बाळासाहेब सानप यांना खास निमंत्रित करण्यात आले. परिसंवाद, साहित्य संमेलन, कविसंमेलन या बौद्धिक व विचारप्रवण कार्यक्रमांपासून मात्र राजकीय मंडळींना दूर ठेवले गेले.

राजकीय नेते समारोपावेळी

साहित्य रसिकांना राजकीय प्रभृतींची भेट थेट दुसऱ्या दिवशी समारोपावेळी होईल. परंतु, ही कसर तेव्हा भरून निघेल, अशी तजविज आहे. कारण, समारोप सोहळ्यात भाजपच्या सीमा हिरे, शिवसेनेचे योगेश घोलप, राष्ट्रवादीचे हेमंत टकले व जयंत जाधव, काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे असे सर्वपक्षीय आमदार निमंत्रित आहे. तसेच उपमहापौर प्रथमेश गीते, महापालिका स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील आणि केवळ सत्ताधारी नको म्हणून महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनाही प्रमुख मान्यवरांचे यादीत स्थान देण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही सावाना विसरले नाही. उद्घाटनाच्या दिवशी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा व पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल तर समारोपाच्या दिवशी विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे हे प्रमुख अतिथी असतील.