नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याच्या यशस्वीततेसाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्थांबरोबर प्रशासनातील विविध यंत्रणा अहोरात्र झटल्या. यावरून काही विशिष्ट यंत्रणांमध्ये श्रेयाची लढाई सुरू असताना कुंभमेळ्याचा खऱ्या अर्थाने जागर करत तो विविध माध्यमांतून घराघरात पोहोचविणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाची कामगिरी मात्र दुर्लक्षित राहिल्याचे लक्षात येते. वास्तविक, या विभागाने प्रथमच ‘मल्टी कॅमेरा सेटअप’ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शाही पर्वण्यांचे थेट प्रसारण जगातील दूरचित्रवाहिन्यांना नि:शुल्क उपलब्ध करून दिले. यामुळे ज्यांना या सोहळ्यात सहभागी होता आले नाही, त्यांना घरबसल्या शाही मिरवणूक, शाही स्नान थेट पाहणे शक्य झाले. राष्ट्रीय माध्यम केंद्राच्या उभारणीसह समाज माध्यमांद्वारे कुंभमेळ्याच्या जागर करण्यात या विभागाने महत्वपूर्ण भूमिका निभावली.
महापर्वाच्या वार्ताकनासाठी जगभरातून आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची जबाबदारी या विभागावर होती. या प्रतिनिधींना सुरक्षा पास मिळवून देणे हा प्राधान्याचा विषय होता. त्यावरून प्रारंभी काही प्रवाद निर्माण झाले. परंतु, माहिती कार्यालयाने नाशिकसाठी दीड हजार तर त्र्यंबकेश्वरसाठी ५०० हून अधिक जणांची शिफारस केल्यामुळे पोलीस यंत्रणेकडून ते वेळेत उपलब्ध होऊ शकले. छायचित्र, बातम्या, चित्रीकरण वेळेत पोहोचविता यावे म्हणून रामकुंड, साधूग्राम व त्र्यंबकेश्वर येथे उभारलेल्या राष्ट्रीय प्रसारमाध्यम केंद्राचा सर्वाना लाभ झाला. लीज लाईन, इंटरनेट सेवा, वायफाय आदींची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होती. पर्वणी काळातील शाही मिरवणूक, शाही स्नान यांचे थेट ‘लाईव्ह क्लिन फिड’ उपलब्ध करून देण्यासाठी ‘मल्टी कॅमेरा सेटअप’च्या उपक्रमास जगभरातील वृत्तवाहिन्यांचा प्रतिसाद मिळाला. नाशिक येथे वेगवेगळ्या ठिकाणी १६ तर त्र्यंबकेश्वरला ११ ठिकाणी अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे हे थेट प्रसारण करण्यात आले. अनेक वृत्तवाहिन्यांनी ते प्रसारीत केले.
सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, सिंहस्थ संवाद मालिका, दूरदर्शन व आकाशवाणीवर मुलाखतीचे कार्यक्रम, स्थानिक ते देशपातळीवरील विविध माध्यमांद्वारे नाशिक पर्यटन ब्रँडिंगच्या जिंगल्स, राज्यात ४०० फलक आणि तितक्याच एसटी बसगाडय़ांवर कुंभमेळ्याचे फलक लावून जागृती करण्याचे काम या विभागाने नेटाने पार पाडले. महापर्वाच्या प्रसिध्दीत समाज माध्यमांचाही वापर करण्यात आला. ही जबाबदारी माहिती उपसंचालक सतीश लळीत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयातील वरिष्ठ सहाय्यक संचालक किशोर गांगुर्डे व नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांच्या चमूने पार पाडली.
या निमित्ताने प्रसारमाध्यमांच्या गरजा पूर्ण करण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलल्याची प्रतिक्रिया लळीत यांनी व्यक्त केली. महासोहळ्याचे विनाशुल्क थेट प्रक्षेपण आम्ही सर्व वाहिन्यांना उपग्रहामार्फत देऊ शकलो. ही बाब कुंभमेळ्याच्या इतिहासात नोंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कुंभमेळा यशस्वी झाल्याचे श्रेय घेण्यावरून काही प्रमुख विभागांमध्ये सध्या चढाओढ सुरू आहे. मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणेचे प्रमुख शाही मिरवणुकीवेळी आपल्या अधिकारी-कर्मचारी वर्गाचे नियंत्रण करण्याऐवजी छायाचित्र काढण्यात मग्न होते.
सिंहस्थात हरविलेल्यांचा शोध घेण्यात पोलिसांनी अथक प्रयत्न केले. पण, त्याचेही श्रेय संबंधितांकडून घेतले गेले. या घडामोडीत माहिती व जनसंपर्क विभागाचे काम खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरले.