अपघातातील जखमी वासुदेव बर्वे यांचे निधन
कॉलेजरोड परिसरात महाविद्यालय प्रवेशद्वारावर अस्ताव्यस्त पद्धतीने उभ्या असलेल्या रिक्षा, भरधाव कसरती करत निघालेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे जिवावर बेतत असून या प्रकारांचा गोखले एज्युकेशन सोसायटीतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर मानवी साखळी करत निषेध केला. सोमवारी अपघातात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कॉलेज रोड परिसर काही टवाळखोरांना वाहनावर ‘स्टंटबाजी’ करण्यासाठी महत्वाचा वाटतो. दुचाकीवर वेगवेगळ्या कसरती करणे अथवा भरधाव वेगात अचानक ब्रेक लावणे अशा विविध लिला या परिसरात सुरू असतात. कॉलेज रोडवरील या दुरावस्थेत भर घालण्याचे काम महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच खाद्य पदार्थांच्या दुकानासमोर अस्ताव्यस्त लावलेली अन्य वाहने करतात. मागील आठवडय़ात एसएमआरके महिला महाविद्यालयातील वासुदेव बर्वे (४०) हे कामानिमीत्त रस्ता ओलाडत असताना त्यांना भरधाव जाणाऱ्या दुचाकीने धडक दिली. रविवारी दुपारी त्यांचे निधन झाले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी अपघातानंतर धडक मोहीम राबवत बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली. परंतु, ती एक दिवसापुरतीच सिमित राहिली.
कॉलेज रोड हा अपघातप्रवण क्षेत्र बनल्याची अस्वस्थता प्रदीर्घ काळापासून आहे. बर्वे यांच्या अपघाती निधनामुळे ही अस्वस्थता मूक आंदोलनाद्वारे प्रगट झाली. संस्थेच्या सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरण्याचे ठरवले. सकाळ सत्रातील सर्व तासिका आटोपल्यानंतर प्राध्यापक व कर्मचारी एकत्र झाले. बर्वे यांना कॉलेज रोडवर मानवी साखळी करत मूक श्रध्दांजली वाहण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारीच नव्हे तर, कॉलेज रोडवरील हजारो रहिवाशांना दररोज बेशिस्त वाहनधारकांना तोंड द्यावे लागते. आणखी किती जणांचे बळी घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग येईल, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.

मोटारींच्या अपघातात हवालदार जखमी
नाशिक : पंचवटीतील दिंडोरी रस्त्यावरील तारवालानगर सिग्नलजवळ रविवारी मध्यरात्री दोन मालमोटारींची धडक होऊन झालेल्या अपघातात एक हवालदार गंभीर जखमी झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हवालदार गणेश रोकडे हे रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्यातील कामे आटोपून घरी जाण्यासाठी निघाले होते. एकच्या सुमारास ते आपल्या चारचाकी वाहनाने तारवालानगर येथील चौफुलीवर पोहोचले. यावेळी समोरून भरधाव आलेल्या दुसऱ्या मोटारीने त्याच्या मोटारीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहने पलटी होऊन रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या अपघातात रोकडे हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी रोकडेंना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची ही दृश्य सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यावरून त्याची भीषणता निदर्शनास आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.