आगारातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर टी. टी. एस. कालावधीत कापलेले पैसे परत करावेत, प्रोत्साहन भत्त्याची रक्कम परत करावी आदी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र राज्य एस. टी कामगार संघटनेच्या वतीने येथील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन विभाग नियंत्रकांना दिले. नाशिक विभागातील कामगारांच्या प्रश्नांबाबत संघटनेने या आंदोलनाचे आयोजन केले होते. नाशिक १ आगारातील स्वच्छतागृह दुरूस्तीबाबत वारंवार पाठपुरावा करूनही टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. कर्मचारी निवृत्त होत असताना त्याने टी. टी. एस. कालावधीतील रजेचे पैसे कापून घेतले जातात. कोणत्याही परिपत्रकाचा आधार नसतांना ही बेकायदेशीर कपात केवळ नाशिक विभागातच सुरू असून ती त्वरित बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली. टी. आर. पी. येथील एकत्रित वेतनावरील कर्मचाऱ्यांची उत्पादन प्रोत्साहन भत्त्यांची रक्कम त्वरित अदा करावी, टीआरपीसह सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या खात्यामार्फत बढती परीक्षा तातडीने घेण्यात याव्यात, कामावर रुजू असताना मृत्यू आल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नोकरी देण्यात यावी याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. शहर बससेवेच्या मार्गावर कंपनी कामगारांना सेवा देणाऱ्या खासगी बसद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई केली जात नसल्याची तक्रार संघटनेने केली आहे. कामगार करार व परिपत्रकानुसार नोंदणीकृत असलेल्या युनियनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, मनमाड येथील एक शिपाई वारंवार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबाबत खोटय़ा तक्रारी पोलीस ठाण्यात करतात. तसेच बाहेरील व्यक्तींमार्फत आगारात दहशत निर्माण करतात. त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, मालेगाव येथे कामगार वसाहतीत वीज जोडणी देण्यात यावी, मालेगाव आगारातील तुटलेली दगडी भिंत बांधण्यात यावी, सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली अर्ज ज्येष्ठतेनुसार करण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या.