जिल्ह्य़ात पाणीप्रश्न बिकट होत असताना गावात पाणीपुरवठा व्हावा, काही योजना राबविण्यात यावी, या मागण्यांसाठी राजकीय पक्षांकडून प्रशासनावर सातत्याने दबाव आणला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आवारात पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काही उत्साही कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.पाणीटंचाईमुळे सध्या अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. कालवा व धरणातून पाण्याचे आवर्तने सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
जिल्ह्य़ातील पांगरी व दोडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी गावपातळीवर आंदोलन करत पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची दखल स्थानिक लोकप्रतिनिधी वगळता प्रशासनाने घेतली नाही.
परिणामी, कार्यकर्त्यांचा जथा मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या आवारात जमा झाला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाला कुलूप ठोकण्याचा काहींनी प्रयत्न केला. मात्र मुख्याधिकारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात असल्याचे समजल्यावर हा जथा तेथे धडकला. त्या वेळी संबंधितांना निवेदन न देता केवळ गावात पाणी योजनाच आली नाही, काही योजना सुरू झाली, पण तिची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही, पाण्याचे आरक्षण आमच्यासाठी ठेवलेच नाही, यासह अन्य काही मुद्दय़ांवर असंबद्ध बडबड करत निघून गेला. आंदोलनाचा फार्स
आटोपताना संबंधितांनी जबाबदार अधिकाऱ्यांना ना निवेदन दिले, ना चर्चा केली. आंदोलनामुळे झालेल्या गोंधळाची जिल्हा परिषद आवारात चर्चा होती.