प्रवाशांवर कोणत्याही प्रकारची दरवाढ न लादता रेल्वे अर्थसंकल्पाने दिलासा दिला असला तरी त्याबद्दल उत्तर महाराष्ट्रात संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उत्तर महाराष्ट्राच्यादृष्टिने महत्वाकांक्षी अशा मनमाड-इंदूर नवीन रेल्वे मार्गाची उभारणी, मनमाड ते जळगाव तिसऱ्या अतिरिक्त रेल्वे मार्गाची उभारणी आणि मनमाड ते दौंड दुहेरी रेल्वे मार्गाची घोषणा, नाशिक-पुणे रेल्वे मार्ग आदींच्या अंतर्भावामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधी व प्रवाशांकडून त्याचे स्वागत होत असले तरी या भागातील अनेक प्रश्न दुर्लक्षित राहिल्याची रेल परिषदेसह काहींची भावना आहे.
यंदाच्या रेल्वे अर्थ संकल्पात बहुप्रतिक्षीत मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाबाबत महत्वाची घोषणा होईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यास यश मिळाल्याचे या अर्थसंकल्पाने दर्शविले. मनमाड-इंदूर या नव्या रेल्वे मार्गाच्या घोषणेला मूर्त रूप देण्यासाठी त्वरेने या मार्गाचे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच अर्थसंकल्पात जळगाव ते मनमाड या मार्गावर तिसरा नवीन लोहमार्ग टाकण्यास मंजुरी देण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून भुसावळ-मनमाड-मुंबई मार्गावर प्रवासी संख्या वाढत आहे. रेल्वे गाडय़ांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे ही वाढती गर्दी लक्षात घेऊन जळगाव ते मनमाड असा नवा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार असून यामुळे रेल्वेच्या प्रवासी गाडय़ांची वाहतूक अधिक वेगाने नियंत्रीत करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या मार्गावर आणखी काही नव्या गाडय़ाही धावतील असे प्रवासी वर्गाचे म्हणणे आहे. २००४ पासून आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यंदा यश आल्याची प्रतिक्रिया खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. मनमाड-इंदूर आणि नाशिक-पुणे रेल्वे मार्गास मंजुरी ही त्याची ठळक उदाहरणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसात मनमाड ते दौंड मार्गावर रेल्वेचे इलेक्ट्रीक इंजिनही धावणार आहे.
अर्थसंकल्पात जनरल बोगीत मोबाईल चार्जिगची सुविधा, पॅसेंजर गाडय़ांचे वेग वाढणार, सामान्य प्रवाशांसाठी अनारक्षित गाडय़ांची संख्या वाढणार, रेल्वे स्थानकातील हमाल या पुढे सहाय्यक म्हणून संबोधून त्यांना गणवेश देण्यात येणार आहे आदींचे सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे. या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्रातील अनेक महत्वपूर्ण मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची प्रतिक्रिया रेल परिषदेचे प्रमुख बिपीन गांधी यांनी व्यक्त केली.