नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. येथून जाणाऱ्या धावत्या गाड्यांमध्ये तसेच रेल्वे फलाटावरही चोरीच्या घटना घडत असताना बुधवारी मनमाड येथील रेल्वेच्या आरक्षण कार्यालयात घुसून अज्ञात चोरांनी १ लाख ६ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या फिल्मी शैलीतील दरोड्याच्या घटनेने रेल्वे प्रशासन हादरले आहे. याप्रकरणी खासगी ठिकाणाहून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रेल्वेसह शहर पोलिस प्रशासनाने तपास सुरु केलाय.

दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्हीच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न निर्माण चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. प्रवाशांनी गजबजलेल्या रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयातील या घटनेमुळे एकच खळबळ माजली घडली. येथील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे जनरल वेटींग रुम असून याच ठिकाणी रेल्वेचे तिकीट घर आणि आरक्षण केंद्र आहे. या ठिकाणी अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असते. या प्रकरणी रेल्वेचे मुख्य आऱक्षण पर्यवेक्षक केशव तुकाराम पराते यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना घडली त्यावेळी पराते यांच्यासह दोन आरक्षण कर्मचारी काऊंटरवर होते. पराते यांनी दोन्ही काऊंटरची कॅश जमा करुन कार्यालयात भरण्यासाठी कॅश मेमोसह बांधून ठेवलेली होती.

दुपारी सव्वा दोनच्या सुमारास  ते व त्यांचे सहकारी चहा पिण्यासाठी बाहेर गेले. त्यावेळी आरक्षण कार्यालयात एस.के.जयस्वाल व एच.के.जैन असे खिडकी क्र.१ व २  वर आरक्षण कामात व्यस्त होते. त्याचवेळी निळ्या रंगाचा शर्ट घातलेला, मध्यम बांधा व सावळा रंग अशा वर्णाचा इसम आरक्षण कार्यालयात शिरला. त्याने खिडकी क्र.२ च्या काऊंटरमध्ये मेमोसहीत ठेवलेली १ लाख ६ हजार २८० रुपयांची रक्कम लंपास केली.  जयस्वाल यांनी  या चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु हा इसम पळून जाण्यात यशस्वी झाला.  फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रेल्वेच्या आऱक्षण कार्यालयात हा इसम थेट आतमध्ये कसा गेला, हा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. या संशयित इसमाबरोबर बाहेर आणखी तीन ते चार इसम असावेत, तसेच नियोजन करुन त्यांनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

दरम्यान, रेल्वेच्या आरक्षण कार्यालयाजवळील सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रण स्पष्टपणे दिसत नाही. तर याच परिसरातील अन्य एक कॅमेरा बंद असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, स्टेशन प्रवेशद्वारासमोर असलेल्या एका खासगी हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, दोन ते तीन संशयत इसम दिसून आले. तसेच रस्त्यावर एक अनोळखी चारचाकी वाहन असल्याचे दिसून आले. लोहमार्ग पोलिस निरीक्षक चंद्रशेखर भाबल, शहर पोलिस निरीक्षक पी.टी.सपकाळे, रेलवे सुरक्षा दलाचे निरीक्षक के.डी.मोरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयीतांचा तपास सुरु केला आहे. मनमाड हे रेल्वेचे जंक्शन असून याठिकाणी दिवसभरात १२० पेक्षा अधिक रेल्वे गाड्यांचे मार्गक्रमण होते. ११ हजारच्या आसपास प्रवासी याठिकाणी दररोज येतात.  या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने याठिकाणी रेल्वे स्थानक आणि परिसरात उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसवावे आणि रेल्वेच्या मालमत्तेसह प्रवासी सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.