गोदा उद्यान, वनौषोधी उद्यान आणि पांडवलेणीच्या पायथ्याशी सायकल ट्रॅक, उड्डाणपुलाखालील तीन किलोमीटरच्या जागेत जॉगिंग ट्रॅक, होळकर पुलालगत ‘जिनिव्हा फाऊंटन’च्या धर्तीवर कारंजे, बाळासाहेब ठाकरे स्मारकात ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, मोकळ्या जागेत विविध खेळांसाठीची व्यवस्था.. अशा विविध योजनांच्या माध्यमातून मनसे नाशिकचा चेहेरामोहरा बदलत असल्याचे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले. पालिकेची सत्ता हाती आल्यावर विकासकामांच्या मुद्यावरून मनसेला धारेवर धरण्यात आले. तथापि, कोणतेही काम दृश्य स्वरुपात येण्यास काही कालावधी लागतो. देशातील इतर शहरांना नाशिकचे अनुकरण करावे लागेल. यामुळे झालेल्या विकास कामांबद्दल मनसेला कौतुकाची थाप मिळाली तर प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महापालिकेने निर्मिलेल्या ‘स्मार्ट नाशिक’ अॅप आणि स्मार्ट सिटी संकेतस्थळाचे लोकार्पण मंगळवारी राज यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज यांनी आपल्या खास शैलीत प्रारंभी विकास कामे होत नसल्याची ओरड करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. भ्रमणध्वनी अॅपच्या माध्यमातून शहरवासीयांसाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. त्या प्रणालीत चांगले काम झाल्यास ‘धन्यवाद’ देण्यासाठी एक व्यवस्था असावी असेही ते म्हणाले. शहरात कुंभमेळा सुरू आहे. त्यामुळे अलीकडेच साधू-महंतांची भेट झाली. राजकारणात केवळ संधी साधूच भेटतात. सिंहस्थासाठी आलेल्या साधू-महंतांनी साधुग्राममध्ये पालिकेने उपलब्ध केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल प्रशस्तीपत्रक दिले. देशात इतरत्र होणाऱ्या कुंभात कधी मिळाली नाही, अशी व्यवस्था नाशिक पालिकेने केल्याचे साधू-महंतांनी सांगितल्याचा राज यांनी आवर्जुन उल्लेख केला.
नवीन अॅपच्या माध्यमातून पालिकेच्या कारभारात पारदर्शकता येणार आहे. राज्यातील इतर महापालिकेत काय कामे सुरू आहेत ते देखील कोणी सांगत नाही. एखादे शहर चांगले दिसावे, असावे ही आपली आवड आहे. त्यात आपला कोणताही स्वार्थ नाही. शहर चांगले दिसावे म्हणून अनेकविध योजना मांडण्यात आल्या आहेत. त्यात शहरवासीयांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे. शालेय जीवनात वाहतुकीचे नियम अवगत व्हावे म्हणून चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क लवकरच खुले होत आहे. इतर शहरात उड्डाण पुलाखालील जागेचा वापर सकाळी ‘खो-खो’ची स्पर्धा असल्याप्रमाणे, वाहने उभी करणे वा टपऱ्यांसाठी केला जातो. नाशिकमधून जाणाऱ्या उड्डाण पुलाखालील तीन ते साडे तीन किलोमीटरच्या मोकळ्या जागेत जॉगिंग ट्रॅकचे काम लवकरच सुरू होत आहे. होळकर पुलालगत जिनिव्हा फाऊंटनच्या धर्तीवर दोन संगीतमय व आकर्षक रोषणाईचे कारंजे साकारण्यात येणार आहेत. गंगापूर रस्त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे संग्रहालय प्रस्तावित आहे. शहरातील मोकळ्या जागांवर बॅटमिंटन, टेनिस व बंदीस्त क्रीडांगणाची खास व्यवस्था करण्यात येणार असल्याचे राज यांनी नमूद केले.
या सर्व कामांचे क्षेय महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांचे असून त्या सर्वाना व्यासपीठावर बोलावून त्यांचे आभार राज यांनी मानले.

सत्तेसाठी पुन्हा साकडे
राज्यात मनसेला एकहाती सत्ता मिळाल्यास आणि पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासारखे दहा अधिकारी मिळावे मग महाराष्ट्र कसा ठिकठाक होत नाही ते पाहतो, अशा शब्दात राज यांनी गेडाम यांच्या कामाचे कौतुक करताना पुन्हा एकदा राज्याची सत्ता हाती द्यावी असे अप्रत्यक्षपणे सूचित केले.