सोने-चांदीने सजविलेल्या राख्या बाजारात

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे राखी खरेदीसाठी बाजारपेठेत भगिनींची गर्दी होऊ लागली आहे. वस्तू सेवा करामुळे राख्यांच्या किमतीत १५ ते २० टक्क्य़ांनी वाढ झाली असली तरी राख्या खरेदीचा भगिनींचा उत्साह मात्र कायम आहे. आबालवृद्धांच्या आवडीनिवडी जपत बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. काही हौशी मंडळींनी खास सोन्या-चांदी, हिऱ्यांनी सजविलेल्या राख्यांना पसंती दिली आहे.

श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. शाळांमध्ये त्या निमित्त राखी बनवा स्पर्धेसह शाळेच्या आवारात बच्चे कंपनीला राखी पौर्णिमा साजरी करण्याचे वेध लागले आहेत. काहीं शाळांमध्ये मुलांवर सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, सामाजिक विषयांची जाण व्हावी या दृष्टीने ‘एक राखी सैनिकांसाठी’, पर्यावरणस्नेही राखी आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

उत्सवाला लाभलेली सामाजिक किनार जपत काहींनी पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले आहे. यासाठी बाजारात आलेल्या नावीन्यपूर्ण राख्या खरेदी करण्यासाठी महिलांनी प्राधान्य दिले आहे.

पुणे, गुजरात, मुंबई, पनवेल, नाशिकसह अन्य भागातून निर्मिलेल्या राख्या बाजारात पाहावयास मिळतात. उत्सवाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असल्याने बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.  संतोष रक्षा बंधनचे पोपटलाल बोरा यांनी मागील वर्षांच्या तुलनेत इंधन दरवाढ तसेच वस्तू सेवा कर यामुळे राख्यांच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली झाल्याचे नमूद केले. परंतु, त्याचा ग्राहकांच्या खरेदीवर कोणताही परिणाम झालेला नाही. कुंदन आणि खडे, आकर्षक सजावटीच्या राख्यांना विशेष मागणी असल्याचे बोरा यांनी सांगितले. काही ग्राहकांनी सोन्या, चांदीच्या धातूचा वापर करीत तयार केलेल्या राख्यांना पसंती दिली आहे. ब्रेसलेट स्वरूपात राख्याचे वेगळे प्रकार सराफ दुकानांमध्ये दृष्टिपथास पडतात.

राख्यांमधील विविधता

महिला वर्गासह बच्चे कंपनीची आवड जपण्यासाठी विक्रेत्यांनी स्पंज, गोंडा, कुंदन, खडे, मणी, मोती, चांदीचे वर्ख असलेली असे विविध पर्याय उपलब्ध केले आहे. किमान ४ रुपयांपासून ते कमाल २५० रुपयांपर्यंत एक नग अशी राख्यांची विक्री होत आहे. यंदा बाजारात ‘रक्षाबंधन स्पेशल फोटो राखी’ हा नवीन प्रकार आला आहे. बाजुला सोनेरी वर्ख असलेली किनार व मध्यभागी आपल्या भावाचे छायाचित्र व रेशीम धागा असे या राखीचे स्वरूप असून त्यासाठी १५० रुपयांपासून अधिक किंमत मोजावी लागते. यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक असून महिला वर्गाची या राखीलाही विशेष पसंती मिळत आहे. महिला वर्गासाठी लटकन, भय्या भाभी, जोडी तुझी माझी असे राख्यांचे वेगळे काही पर्याय उपलब्ध आहेत. बच्चे कंपनीला आवडणारे छोटा भीम, बाल गणेश, छोटा हनुमान, चुटकी, राजू, डोरोमन, जोकर, टेडी बेअर यासह आकर्षक सजावटीच्या राख्या ३० रुपयांपासून पुढील दरात आहेत. विशेष म्हणजे डोरोमन वगळता अन्य चिनी कार्टुन्स व राख्या बाजारातून अंतर्धान पावल्या आहेत.