‘भोसला’तील परिसंवादात निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे मत

पाकव्याप्त काश्मिरात शिरून भारतीय लष्कराने केलेली कारवाई पाकिस्तानने मान्य केल्यास त्या ठिकाणी दहशतवादी होते हे आपसूक मान्य होईल. त्यामुळे पाकिस्तान भारतीय लष्करी कारवाई नाकारत केवळ गोळीबार झाल्याचे सांगत असल्याचे मत निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. हल्ला झाल्याचे पाकिस्तानला मान्य नसल्याने प्रतिहल्ला कसा होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

येथील भोसला सैनिकी महाविद्यालयात शुक्रवारी ‘पाकव्याप्त काश्मीरवर सर्जिकल स्ट्राईक’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रिगेडियर बलजीत गिल (निवृत्त), कॅप्टन व्ही. सी. आगाशे (निवृत्त), भोसला सैनिकी महाविद्यालयाचे कमांडंट चंद्रसेन कुलथे यांनी लष्करी कारवाईचे विश्लेषण केले. या स्वरूपाची कारवाई आज झालेली नाही. याआधीही त्याचे प्रयोग झाले आहेत. मात्र त्याविषयी कुठेही फारशी चर्चा झाली नाही. कारण दहशतवादविरोधी लढाईत भारत एकटा पडत होता. मागील दोन वर्षांत मोदी सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्येक देशाशी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केल्याने भारताच्या बाजूने जनाधार तयार झाला आहे. गुरुवारच्या कारवाईने पाकिस्तानचा खरा चेहरा सर्वासमोर आला असल्याचे संबंधितांनी सांगितले. गिल यांनी आर्थिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याने भारत खुल्या युद्धासाठी नेहमीच तयार असल्याचे नमूद केले. पाकिस्तानला आपल्या क्षमतांची जाणीव असल्याने तो छुप्या युद्धाचा प्रयत्न करतो. पाकिस्तान, चीन यांच्याकडून वेळोवेळी झालेल्या हल्ल्यात काश्मीरचा काही भाग पाकिस्तानशी जोडला गेला. त्यातील काही भागावर आज व्यापाराच्या दृष्टीने चीन-पाकिस्तानने महत्त्वपूर्ण कॉरिडॉर मार्ग तयार केला आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशातील काही भागावर दावा केला जातो. आजच्या स्थितीत खुले युद्ध झाले तर पाक आणि चीनसोबत काही काळ परिस्थिती भारत चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो असेही ते म्हणाले. देशाची क्षमता आहेच. त्याला मित्र राष्ट्रांची मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुलथे यांनी पाकिस्तानची निर्मिती ही भारताच्या द्वेषातून झालेली असल्याने त्यांच्याकडून हल्ले होतच राहणार हे गृहीत धरले पाहिजे याकडे लक्ष वेधले.  भारताने हल्ला करण्याआधी पाकिस्तानसह ३० देशांना त्याची माहिती दिली असल्याचे कुलथे यांनी सांगितले. आगाशे यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या विविध मुद्दय़ांकडे लक्ष वेधले. प्राचार्य शीला कोचरगांवकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.