जळगाव जिल्ह्य़ातील निवडणूक होणाऱ्या पालिका :  अमळनेर, चोपडा, यावल, फैजपूर, चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, रावेर, पारोळा, जामनेर, भुसावळ, धरणगाव, सावदा.

एकनाथ खडसे यांना भाजपने घरी बसविल्यावर त्यांची खदखद कायम असतानाच, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी सुरू झालेल्या शीतयुद्धाचा जळगाव जिल्ह्य़ात भाजपला फटका बसेल का, याची चर्चा सुरू झाली आहे. जळगावचा गड ढासळल्यास खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. उत्तर महाराष्ट्रात यामुळेच जळगावचा ‘निकाल’ कसा लागतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. धुळे जिल्ह्य़ात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुरेश भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर महाराष्ट्राचा गड कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल.

जळगाव जिल्ह्य़ात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होणार आहे. धुळ्यातील दोन पालिकांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असल्याने त्यांच्या हातून सत्ता हिसकावण्याचे भाजपसह शिवसेनेपुढे आव्हान राहील. नंदुरबार जिल्ह्य़ातील एकमेव शहादा पालिकेत राष्ट्रवादीला रोखण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्राने भाजपला साथ दिली होती.

जळगाव जिल्ह्य़ात १३ नगरपालिकांची निवडणूक होणार आहे. गेल्या एक-दोन महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांसारखे नेते जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणे अवघड आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांनाही एकमेकांची गरज असली तरी तसे होणे नाही, असेच दिसत आहे. विशेषत: काँग्रेसपुढे तर अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा करत असला तरी बहुतांश पालिकांमध्ये वेगवेगळ्या आघाडय़ांच्या माध्यमातून मैदानात उतरण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

सध्या भाजप सावदा आणि यावल, शिवसेना पाचोरा आणि धरणगाव (एरंडोलमध्ये खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून, तर चोपडय़ात सर्वपक्षीय सत्तेत सहभाग), राष्ट्रवादीकडे सावदा, फैजपूर, चाळीसगाव, पारोळा, भुसावळ या पालिका आहेत. मागील निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादीने महागाईसह कृषी मालास न मिळणारा भाव हे मुद्दे मांडण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जामनेर येथे झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी कापसाला मिळणाऱ्या भावाचा विषय मांडला होता. त्यामुळेच राष्ट्रवादीने हा विषय प्रचाराचा मुद्दा केला आहे. पाच पालिका हाताशी असलेल्या राष्ट्रवादीच्या हातातून धरणगावची सत्ता एका मताने, तर चोपडय़ाची सत्ता चिठ्ठीमुळे गेली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष नंबर एक राहील, असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केला आहे. गुलाबराव पाटील यांना मिळालेले मंत्रिपद, ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांची जळगाव घरकुल घोटाळ्यातून जामिनावर मुक्तता आणि भाजपमधील खडसे-महाजन वाद हे विषय शिवसेनेसाठी फायदेशीर असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत आहे. पालिका क्षेत्रातील विकास कामे तसेच पाचोरा, चोपडा, धरणगाव ग्रामीण या मतदारसंघात आमदारांची विकासकामे हे शिवसेनेच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे राहणार आहेत. कोणत्याही नगरपालिकेत आघाडी करण्यात येणार नाही, असा विश्वास जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केला आहे. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे जिल्ह्य़ात  दोन खासदार, एक मंत्री, चार आमदार आहेत. परंतु, पालिकांच्या राजकारणात भाजपचा फारसा प्रभाव पडलेला नाही. त्यातच खडसे व महाजन यांच्यातील कलह भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे पदाधिकारीच मान्य करतात. या निवडणुका पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केली आहे.

धुळे जिल्ह्य़ात काँग्रेसला रोखण्याचे आव्हान

केंद्र व राज्यातील मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या धुळे जिल्ह्य़ात दोंडाईचा-वरवाडे आणि शिरपूर या दोन पालिकांची निवडणूक होत असून भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. मुळात या दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेवर नाही. त्यामुळे जागांमध्ये वाढ झाली तरी भाजपसाठी ते फायदेशीरच ठरणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा-वरवाडे पालिकेच्या १२ प्रभागातून २४ नगरसेवक निवडले जातील. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सध्या पालिकेवर माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. मागील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीतर्फे नेतृत्व करत २३ पैकी १७ जागा जिंकून एकहाती सत्ता आणली होती. अलीकडेच देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. १९८५ पासून काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमरीश पटेल आणि त्यांचे बंधू विद्यमान नगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर पालिकेवर काँग्रेसची सत्ता कायम आहे. नवीन प्रभाग रचनेत तीन जागांची वाढ झाल्याने १५ प्रभागातून ३० उमेदवार निवडले जाणार आहेत. राज्यातील सत्तेचा वापर करून भाजप मित्रपक्षांच्या साहाय्याने काँग्रेसला टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

नंदुरबार जिल्ह्य़ात शहादा पालिकेत पी. के. पाटील यांचे पुत्र दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीप्रणीत आघाडीला रोखण्यासाठी इतर सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील निवडणुकीत २४ पैकी १७ जागा जिंकून काँग्रेसने वर्चस्व मिळविले होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते दीपक पाटील यांच्यासह समर्थक राष्ट्रवादीत गेल्याने पालिकाही राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. त्यांना काँग्रेस नगरसेवकांचीही साथ मिळाली.

भाजपमध्ये वाद

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात ताणले गेलेल्या संबंधांची किनार या निवडणुकीस आहे. खडसे-महाजन यांच्यातील मतभेदाचा लाभ उठविण्यासाठी शिवसेना तसेच राष्ट्रवादीकडून डावपेच आखण्यास सुरुवात झाली आहे.  या निवडणुकांमध्ये भाजपच्या खडसे, महाजन या मंत्र्यांसह शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील, तुरुंगातून बाहेर आल्यावर सक्रिय झालेले ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.