भगवान मराठे यांच्याकडून सामाजिक जाणीवांचे संदेश; राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ
एरवी अनधिकृत फलकांच्या माध्यमातून स्वत:ची छबी चमकावण्यात मग्न असणाऱ्या एकाही राजकीय पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सात अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी असे वाटले नाही. रिक्षावर फलक बसवून विविध सामाजिक संदेश देणारे रिक्षाचालक भगवान मराठे यांनी ही खंत जाणवली आणि त्यांनी तातडीने हुतात्म्यांना आपल्या फलकाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत भावनेला वाट मोकळी करून दिली. विविध सामाजिक संदेश देण्यासाठी धडपडणाऱ्या मराठे यांची भावना राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांना आत्मपरीक्षण करण्यास लावणारी आहे.
उत्तमनगर ते सीबीएस या मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी भगवान मराठे यांची रिक्षा तशी बहुतेकांच्या परिचयाची. त्याचे कारण रिक्षावर झळकणाऱ्या फलकात दडलेले आहे. खरे तर फलकबाजी हा तसा शहरवासीयांच्या डोकेदुखीचा विषय. प्रमुख रस्ते व चौक व्यापणाऱ्या अनधिकृत फलकांनी नाशिकच्या विद्रूपीकरणात भरच टाकली.
राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यात आघाडीवर आहेत. फलकबाजीच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयाने महापालिकांना खडसावले. या गदारोळात मराठे यांचा रिक्षावरील फलकाचा प्रयोग सर्वार्थाने वेगळा आहे. या फलकावर कोणत्याही उत्पादनाची जाहिरात त्यांना अगदी सहजपणे करता येईल. मात्र त्यांनी रिक्षावर फलकासाठी खास व्यवस्था केली ती मुळात जनजागृतीसाठी. १० वर्षांपासून ते रिक्षा चालवतात.
पाच वर्षांपूर्वी त्यांना फलकाच्या उपक्रमाची संकल्पना सुचली. मग त्यांनी पदरमोड करून रिक्षावर फलक लावता येईल अशी खास व्यवस्था केली. महिना १५ दिवसांच्या अंतराने रिक्षावरील संदेश फलक बदलविला जातो. फारसे उत्पन्न नसले तरी त्यासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी असते. पठाणकोटमधील हल्ल्यात सात जवान शहीद झाल्याचे समजल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करणारा फलक रिक्षावर लावला.
पुष्पहार अर्पण केला. शहिदांनी देशासाठी प्राणाचे बलिदान दिले असताना आपण त्यांच्यासाठी इतकी छोटीशी गोष्ट करू शकत नाही का, असा त्यांचा प्रश्न आहे. स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांनी शहिदांना श्रद्धांजली वाहण्याकडे दुर्लक्ष केल्याची सलही त्यांनी लोकसत्ताकडे बोलताना व्यक्त केली.

‘दारू सोडा, देव जोडा’
काही दिवसांपासून त्यांनी ‘दारू सोडा, देव जोडा’ असा फलक लावून व्यसनमुक्तीचे प्रयत्न केले. हा फलक त्यांनी डिसेंबरच्या मध्यानंतर रिक्षावर लावला. त्यामागील कारण अर्थात नववर्षांचे स्वागत मद्यपान न करता केले जावे असा त्यांचा प्रयत्न होता. या संदेशाने प्रभावित झालेल्या तीन ते चार रिक्षाचालकांनी आपण व्यसनाला सोडचिठ्ठी दिल्याचे प्रत्यक्ष भेटून सांगितल्याचे मराठे यांनी नमूद केले. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी भारताचा राष्ट्रध्वज रिक्षावर फडकावणारे मराठे कोणत्याही धर्माच्या सणोत्सवाच्या शुभेच्छाही फलकाच्या माध्यमातून देत असतात. या उपक्रमामुळे रिक्षाचालकांची प्रतिमा बदलण्यास मदत होणार असल्याचा त्यांना विश्वास आहे. मनमानी पद्धतीने भाडे आकारणी, अरेरावीची भाषा, क्षमतेहून अधिक प्रवासी वाहतूक आदी कारणांमुळे नाशिकमध्ये रिक्षाचालकांविषयी प्रवासी वर्गात कमालीचा रोष आहे. मराठे हे त्यास नक्कीच अपवाद असल्याचे त्यांच्या रिक्षातून प्रवास करणाऱ्यांची प्रतिक्रिया आहे.