दिवाळी म्हटले की फटाके, रंगीत रांगोळ्या, फराळाने सजलेले ताट. मात्र याच यादीत वाचन प्रेमी दिवाळी अंकांच्या मेजवानीने अक्षर दिवाळी साजरी करतात. आपल्याला अभिप्रेत दिवाळी अंक हाती पडावा यासाठी वाचक दिवाळीची उत्सुकतेने वाट पाहतात. विविध विषयांवरील दिवाळी अंक बाजारात आले असले तरी त्यांच्या किमती २००-३०० रुपयांच्या आसपास पोहोचल्याने वाचकांचा काहीसा हिरमोड झाला आहे. या एकंदर स्थितीत वाचनालयांनी दिवाळी अंक योजनेचाही पर्याय समोर केला आहे.

दिवाळीच्या खरेदीची सुरुवात आकाश दिव्यांसह अन्य महत्त्वपूर्ण साहित्य खरेदीने होत असली तरी ही यादी संपते ती दिवाळी अंक घेऊन. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मिळणारा निवांतपणा अनुभवता या अंकाद्वारे सभोवतालच्या घडामोडी, सामाजिक प्रश्न, बदलते तंत्रज्ञान यासह महत्त्वपूर्ण विषयांवरील वैचारिक मंथन म्हणून त्याकडे पाहिले जाते.

वेगवेगळ्या वयोगटातील वाचकांची अभिरुची पाहता महिला, कथा, साहित्य, विज्ञान, भविष्य, पाककला, आरोग्य, तंत्रज्ञान, रहस्य, विनोद असे विविध विषयांवरील दिवाळी अंक सध्या बाजारात दाखल झाले आहेत. यातील अनेक अंकांना शतकाची परंपरा असून ते अंक मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. अंकाच्या भाऊगर्दीत अंतर्नाद, अक्षर, साधना, सत्याग्रह, आवाज या दिवाळी अंकांना वाचकांकडून विशेष मागणी आहे. बाजारात अंक येण्याआधीच त्यासाठी वितरकांकडे त्याची आगाऊ नोंदणी केली गेली आहे. यानंतर महिलाविषयक तसेच विनोदी विषयांकडे वाचकांचा कल असून आरोग्य, भविष्य, तंत्रज्ञान, कृषी या अन्य विषयांचा प्राधान्यक्रम ठरत असल्याचे सुभाष सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल दत्ता पगार यांनी सांगितले. युवा वर्गही वाचनाकडे वळत असून त्यांच्याकडून तंत्रज्ञान, विज्ञान, सभोवतालच्या घडामोडी विषयक अंकाची विचारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक वाचनालयाचे संजय रत्नपारखी यांनी अंतर्नाद, अक्षर, साधना, चतुरंग अन्वय यांचा खास वाचक वर्ग असून आजही ते तितकेच लोकप्रिय असल्याचे नमूद केले. चोखंदळ वाचकांसाठी असे अंक मेजवानी ठरतात.

यंदा अंकाच्या किमती ९० ते ३०० रुपयांपर्यंत आहेत. यामुळे वाचकांचा काहीसा हिरमोड झाला आहे. अंकांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन वाचनालयांनी अधिकाधिक वाचकांना ते अंक वाचता यावे यासाठी सहा महिन्यांसाठी २००-३०० रुपये भरून दिवाळी अंक योजना सुरू करण्यात आली आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत योजनेतील सभासदांना या माध्यमातून ७० हून अधिक अंक वाचता येतील. वाचनालयाच्या योजनेला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.