शहर परिसरात चोरीचे सत्र सुरू असून दोन दिवसात झालेल्या विविध घटनांमध्ये चोरटय़ांनी आठ लाखाहून अधिकचा मुद्देमाल लंपास केला. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे राज्य नेमके पोलिसांचे आहे की चोरटय़ांचे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
बंद घरे चोरटय़ांचे लक्ष्य ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. द्वारका येथील लकी सोसायटीतील अमोल नागरे हे नातेवाईकांकडे गेले असताना बंद दरवाजा हेरून चोरटय़ांनी कडी कोंयडा तोडला आणि शयनकक्षातील लोखंडी कपाट तोडून चार लाखाहून अधिकच्या किंमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात १८.५ तोळे सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, अंगठय़ा, नेकलेस, चांदीचे जोडवे, ३७ हजाराची रोख रक्कम यांचा समावेश आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगांव नाका परिसरातील स्वामी नारायण नगरातील जनार्दन कृपा वसाहतीत राहणारे जगदतारसिंह फुमनसिंह कहालो यांचे बंद घर चोरटय़ांच्या कचाटय़ात सापडले. त्यांच्या घरातून ११ तोळे सोने, सोन्याची अंगठी, चैन, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा दोन लाख ९५ हजाराचा माल चोरटय़ांनी लंपास केला. या प्रकरणी आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूद्वारा रस्तावरील सीमा अर्पाटमेंटमध्ये राहणारे जसबीरसिंह गुरूदेवसिंह जैजुआ यांच्या बंद घरातून चोरटय़ांनी ३५ ग्रॅम सोने व रोकड असा एक लाख १९ हजार ५०० रुपयांचा माल लुटून नेला.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णनगरमधील बनारसी स्टील दुकानातुन चोरटय़ांनी देवाच्या अंगावर असलेले चांदीचे मुकूट, चांदीचे झुंबर असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहस्थात चोरटय़ांनी भाविकांची लुबाडणूक केली होती.