रस्त्यावरील लूटमारीनंतर चोरटय़ांनी आता व्यावसायिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. म्हसरूळ लिंक रस्त्यावर श्वेता गॅस एजन्सीत शिरलेल्या तीन संशयितांनी पिस्तुलाचा धाक दाखवत एक लाख १३ हजार रुपयांची लूट करत वितरकाची चारचाकी घेऊन पलायन केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसी टीव्ही अथवा अन्य काही व्यवस्था नसल्याचे पुढे आले आहे.
म्हसरूळ लिंक रोडवर समाधान सुखदेव येशीकर यांची श्वेता गॅस एजन्सी आहे. बुधवारी सायंकाळी एजन्सी बंद झाल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरू होते. येशीकर दिवसभरातील व्यवहारांचा ताळमेळ बसवत असताना तीन संशयितांनी दुकानात प्रवेश केला. नवीन गॅस जोडणी सुरू करायची आहे, काय करता येईल अशी विचारणा करत येशीकर यांना गप्पांमध्ये दंग ठेवले. येशीकर दिवसभरातील भरणा मोजत असताना संशयितांनी अचानक त्यांच्या डोक्यावर पिस्तूल ठेवत एक लाख १३ हजार रुपयांची रक्कम खेचून घेतली. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदुकीचा धाक दाखवल्याने त्यांनाही काही करता आले नाही. ही रक्कम ताब्यात घेऊन संशयितांनी येशीकर यांची बाहेर उभी असलेली कार घेऊन पोबारा केला. त्यानंतर येशीकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त एन. अंबिका व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. संशयित घेऊन पळालेल्या मोटारीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यप्रवण झाली. मात्र, त्याचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायंकाळी दुकानात शिरून लुटमारीच्या या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान, गॅस एजन्सी व गोदाम असूनही सुरक्षिततेच्या दृष्टीने उपरोक्त ठिकाणी कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही. सुरक्षा रक्षक, सी.सी.टीव्ही कॅमेरा आदींची व्यवस्था नसल्याने पोलिसांसमोर उपलब्ध माहितीवर चोरटय़ांना शोधण्याचे आव्हान आहे. हा घटनेत माहितीतील काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.