खासदार निधीतून ४० लाखाचे साहाय्य

समाजातील वंचित घटकातील मूक-बधिर मुलांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन या उद्देशाने कार्यरत असणाऱ्या येथील मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाच्या कार्याची दखल प्रसिद्ध क्रिकेटपटू तथा खा. सचिन तेंडुलकरने घेतली आहे. या विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याला आकार देण्यासाठी समता प्रतिष्ठान संस्थेने मांडलेल्या बहुउद्देशीय अपंग पुनर्वसन प्रकल्पासाठी सचिनने स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून (खासदार निधी) ४० लाखाचा निधी उपलब्ध केला आहे. जिल्हा नियोजन समितीने या बाबतची माहिती संस्थेला कळविली.

कोणत्याही कामासाठी खासदार-आमदार निधी मिळवणे हे एक दिव्य असते. परंतु, समता प्रतिष्ठानला कोणताही द्राविडी प्राणायाम न करता सचिनकडून निधी उपलब्ध झाल्याने सुखद धक्का बसला आहे. एखाद्या संस्थेच्या कामाची माहिती घेऊन आणि त्यांची निकड लक्षात घेऊन सचिनकडून होणाऱ्या मदतीविषयी वारंवार चर्चा होत असते. त्याची प्रचीती या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही आली. सचिनकडून संगमनेर, जव्हार-मोखाडा भागातील संस्थांना झालेल्या मदतीची माहिती वाचून त्यांच्याकडून आपल्या संस्थेच्या कामाची दखल घेतली जाईल या विश्वासाने समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे आणि लोककवी अरुण म्हात्रे यांनी मुंबई येथील सचिन तेंडुलकर यांचे थोरले बंधू नितीन यांचे कलिना येथील घर गाठले. नितीन तेंडुलकर व त्यांची पत्नी मिना यांना अपंग कार्यशाळेविषयी सर्व माहिती दिली. या उपक्रमासाठी शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन उभयतांनी दिले होते. त्यानंतर तेंडुलकर यांना दिलेल्या प्रस्तावाचा खुद्द. प्रा. कोकाटे यांना विसर पडला. परंतु, अचानक तीन महिन्यांनी नाशिकच्या जिल्हा प्रशासनाकडून या कार्यशाळेची इमारत आणि मूक-बधिर मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सचिनने आपल्या स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमातून ४० लाखाचा निधी मंजूर केल्याचे पत्र पाठविल्याचे प्रा. कोकाटे यांनी नमूद केले. जिल्हा नियोजन विभागाने पत्राद्वारे याबाबत माहिती दिली. क्रिकेटच्या विश्वातील एका महान खेळाडूच्या संवेदनशीलतेचा सुखद पैलू या निमित्ताने समोर आल्याची भावना प्रा. कोकाटे यांनी व्यक्त केली. समाजातील वंचित घटकातील मूक-बधिर मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन यावर मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालय काम करते. १९९५ पासून कार्यरत असणाऱ्या या संस्थेत ११० निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनाकडून केवळ ४० विद्यार्थ्यांना अनुदान मिळत असल्याने उर्वरित मुलांच्या गरजा भागविण्यासाठी संस्थेला लोकाश्रयाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना निधी संकलनासाठी धावपळ करावी लागते. या मुलांच्या भावी आयुष्याला आकार देण्यासाठी कृतियुक्त व पर्यावरणपूरक शिक्षण, स्वयंरोजगार व्यवसाय प्रशिक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विशेष मुलांना आत्मभान मिळवून देणाऱ्या या प्रकल्पासाठी आतापर्यंत संस्थेला अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. तथापि, इतक्या मोठय़ा रकमेचे साहाय्य सचिनच्या माध्यमातून प्रथमच मिळाल्याचे कोकाटे यांनी सांगितले.