विविध कारणांसाठी जागेचा शोध सुरू
सह्याद्री रांगेच्या कुशीत वसलेल्या आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असणाऱ्या नाशिकच्या वातावरणाची साधू-महंतांनाही चांगलीच भुरळ पडल्याचे अधोरेखीत होत आहे. आजवर या वातावरणाने बदलीवर येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना मोहित केले. त्यातील बहुतेकांनी मालमत्ता खरेदी करत एकतर नाशिककर होणे पसंत केले. तर, काहींनी सुटीच्या काळात वास्तव्यासाठी नाशिकला प्राधान्य दिले. या श्रृंखलेत आता कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या काही प्रमुख महंतांचा समावेश होत आहे. द्वारका पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांच्यापासून ते सिंहस्थात सरस्वती पदवीने सन्मानित झालेल्या शिवानी दुर्गा यांच्यापर्यंत काही मान्यवरांनी विविध कारणांसाठी नाशिकमध्ये जागेचा शोध सुरू केला आहे.
हिरवळीने नटलेला परिसर, मुबलक पाणी आणि थंड वातावरण ही नाशिकची खासीयत. कधीकाळी नाशिकच्या याच वातावरणाला ब्रिटीश अधिकारी भुलले होते. उन्हाळ्यात खास नाशिकला मुक्कामी राहता यावे म्हणून त्यांनी देवळाली कॅम्प ते मुंबई असे थेट रेल्वे मार्गाचे शिवधनुष्य उचलले. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा स्वातंत्र्योत्तर काळात शासकीय व लष्करी मनसबदारांनी जोपासली. या परिसरात बदलीवर आलेल्या बहुतेकांनी उन्हाळ्यातील आल्हाददायक वातावरण पाहून मालमत्ता खरेदी करण्याचा सपाटा लावल्याचा इतिहास आहे. त्याची परिणती शहर व परिसरातील जागांचे भाव उंचावण्यात झाल्याचे सांगितले जाते. या आल्हाददायक वातावरणाचा ऐहिक सुखाचा परित्याग करणाऱ्या साधू-महंतांवर प्रभाव पडला आहे. कुंभमेळ्यात शाही स्नानाच्या तिन्ही पर्वण्या आटोपल्यानंतर काही महंत नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात जागेचा शोध घेत आहेत.
द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे त्यापैकीच एक. द्वारका शारदा पीठ ट्रस्टच्या नावाने त्र्यंबक परिसरात किमान पाच एकर जागा मिळावी म्हणून त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला आहे. या जागेत ट्रस्टला वेद शिक्षण, पाठशाळा, भगवती मंदिर, मोफत आयुर्वेद उपचार केंद्र, शंकराचार्य निवास, आदी साकारण्याचे नियोजन असल्याचे शंकराचार्याच्या शिष्यांकडून सांगण्यात आले. जागेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवकरच शंकराचार्याचे शिष्य पुन्हा नाशिकला येणार आहेत.
सिंहस्थात आनंद आखाडय़ातर्फे सरस्वती पदवीने सन्मानित झालेल्या शिवानी दुर्गा यांना देखील त्र्यंबकच्या जवळपास सर्वेश्वर आश्रमाची उभारणी करावयाची आहे. त्यासाठी सरस्वती शिवानी दुर्गा आणि त्यांचे शिष्य पहिणे, पेगलवाडी परिसरात एक ते दोन एकर जागेचा शोध घेत आहेत. आश्रमात गो शाळा, कालिमंदिर, हिंदूसह जगभरातील संस्कृतींचा अभ्यास व संशोधनासाठी केंद्र, गुरूकुल पध्दतीने शिक्षण आदींचे प्रयोजन असल्याचे शिवानी दुर्गा यांनी सांगितले. आश्रमासाठी लागणाऱ्या जागेसाठी शासनाकडे कोणतीही मदत घेतली जाणार नसून ती खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येणार आहे. आश्रमाचा हा संकल्प वर्षभरात सिध्दीस जावा, यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खास पूजन केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्र्यंबकेश्वर येथे शैवपंथीय दहा पैकी नऊ आखाडय़ांची स्व मालकीची जागा आहे. केवळ आवाहन आखाडय़ाकडे जागा नसल्याने त्यांना तात्पुरत्या स्वरुपात जागा मिळवावी लागली. या आखाडय़ाने त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्या आखाडय़ास कायमस्वरुपी जागा मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे आधीच केली आहे.
नाशिक-त्र्यंबकच्या तिसऱ्या शाही स्नानानंतर बहुतांश साधू-महंतांनी कुंभ नगरीतून प्रस्थान केले. मात्र, त्यातील काहींना या परिसरात आश्रम स्थापन करण्याची मनस्वी इच्छा आहे. शंकराचार्य स्वरुपानंद आणि सरस्वती शिवानी दुर्गा यांच्यामार्फत चाललेला जागेचा शोध त्याचे निदर्शक ठरले आहे.