गुलाबी थंडीची चाहुल जाणवू लागल्याने महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ म्हणजे नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात परदेशी पाहुण्यांचे येणे सुरू झाले आहे. या पाहुण्यांना भेटण्यासाठी पक्षीप्रेमीही येऊ लागले आहेत. पक्षीप्रेमींना येथील पक्ष्यांविषयी योग्य माहिती देणारे ‘मार्गदर्शक’ मात्र वन विभागाकडून मूलभूत सोयी सुविधा आणि मानधनापासून वंचित आहेत. त्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत असून वन विभागाकडून त्यांना लवकरच सुविधा पुरविण्यात येणार असल्या तरी मानधनाविषयी कोणतीच चर्चा नाही.
गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर साकारलेल्या नांदुरमध्यमेश्वर धरणाचा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. नदीच्या प्रवाहात गाळ साचल्याने उंचवटे तयार झाले. जलाशयातील उथळ पाणी, विपुल जलचर, विविध पाणवनस्पती, किनाऱ्यावरील वृक्षराजी, सभोवतालच्या शेतीतील हिरवीगार पिके या एकूण भौगोलिक संपदेमुळे पक्ष्यांच्या निवासासाठी हक्काचे ठिकाण बनले आहे. या ठिकाणची २४० पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी आणि ४०० पेक्षा अधिक वनस्पतींची विविधता पर्यावरणप्रेमींवर गारुड करते. या ठिकाणी स्वतंत्र वन विभागाचे कार्यालय असणे अपेक्षित असताना नाशिक येथील मुख्य वन्य जीव संरक्षण कार्यालयातून या संपूर्ण कार्यक्षेत्राचा कागदोपत्री कारभार चालतो. त्यामुळे परिसरातील अपुऱ्या सोयी सुविधा, पर्यटकांच्या मागण्या, पर्यावरण प्रेमींचे गाऱ्हाणे यांच्याशी वन विभागाला फारसे काही देणेघेणे नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे. प्रसाधनगृहाचा प्रश्न आजही कायम आहे. मागील वर्षी मनोऱ्यापर्यंत जाण्यासाठी ‘नेचर ट्रेल’ उभारण्यात आला. मात्र पहिल्या पावसात त्यांची दाणादाण उडाली. या ठिकाणी वेळोवेळी मागणी करूनही उपाहारगृह सुरू झालेले नाही. वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी निवासी नसल्याने परिसरात बाहेरच्या लोकांची घुसखोरी होते.
या संपूर्ण परिसराची, नैसर्गिक साधन संपत्तीची खडान्खडा माहिती असलेला एक ८-१० जणांचा समूह या ठिकाणी आहे. वनविभागाने या सर्वाची ‘मार्गदर्शक’ म्हणून नियुक्ती केली. वन विभागाचे हे मार्गदर्शक असले तरी त्यांना विभागाकडून कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जात नाही. पर्यटकांकडून कधी १०-५० रुपये तर कधी दुर्बीण किंवा अन्य अभ्यास साहित्य दिले जाते. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो.
यामध्ये सर्व मार्गदर्शक हे शिक्षण घेणारे आहेत. घरच्यांचा आर्थिक भार हलका करण्यासाठी आपल्या कामाच्या माध्यमातून ही मंडळी छंद जोपासत आहे. पर्यटकांकडून जर मानधन मिळाले नाही तर बऱ्याचदा वादही होतो. याबाबत वनविभागाने मानधन द्यावे ही कित्येक वर्षांची त्यांची मागणी आजही प्रलंबित आहे. मात्र वनविभाग याबाबत मौन बाळगून असून लवकरच त्यांना तंबू, तंबूत राहण्यासाठी गादी, पिण्याचे स्वच्छ पाणी, दुर्बीण, अन्य अभ्यास साहित्य, प्रशिक्षण आदी सुविधा देण्यात येणार आहे.

मानधन देता येणार नाही
वनविभाग मार्गदर्शकांना मानधन देऊ शकत नाही. मात्र लवकरच त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात येणार आहे. पर्यटकांना उपाहारगृहासह अन्य सोयी सुविधा देण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच अभयारण्याचे संरक्षण व विकास यावर काम सुरू आहे.
– एस. व्ही. रामाराव (वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नाशिक)