मंदिरावर संरक्षित जाळ्या बसविण्याचे काम
उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांना २६ नोव्हेंबरपासून महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. सप्तशृंग गडावर मंदिरावरील भागात दरडी कोसळू नयेत म्हणून संरक्षणासाठी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जाळ्या बसविण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत मंदिर बंद ठेवले जाणार आहे.
गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर एका खोबणीत आहे. मंदिरावरील भागात दरडी कोसळण्याचा धोका सतत वर्तविण्यात येत असल्याने मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. अलीकडेच गडावर येणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे सुरक्षिततेला अधिक महत्त्व देत मंदिरावरील गडाच्या भागास संरक्षित जाळ्या बसविण्याचे काम त्वरित सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वस्त मंडळाच्या वतीने देण्यात आली. हे काम करताना खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवावे लागणार आहे. परंतु, भाविकांच्या श्रद्धेचा व स्थानिकांच्या रोजीरोटीचा विचार करत ३० दिवस मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णयाला व्यावसायिक, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी विरोध केला आहे. किमान आठवडय़ातून शनिवार व रविवार हे दोन दिवस मंदिर उघडे ठेवावे किंवा ३० दिवसांऐवजी २० दिवसात हे काम पूर्ण करावे अशी सूचना गवळी यांनी केली आहे. या संदर्भात संबंधितांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विश्वस्तांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली. न्यासाच्या वतीने भाविक व ग्रामस्थांचा दोन कोटीचा विमा काढण्यात आला आहे. जाळ्या बसविण्याचे काम सुरू असतानाही न्यासाच्या वतीने नियमितपणे पूजा सुरू राहणार आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद राहणार असले तरी पहिल्या पायरीवर दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली. दुसरीकडे, सर्वाना विश्वासात घेऊन निर्णय घेतले पाहिजे, अशी अपेक्षा पोलीस पाटील शशिकांत बेनके यांनी व्यक्त केली.
जाळ्या बसविण्याचे काम विदेशी तंत्रज्ञानावर आधारित असल्याची माहिती कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने के. आर. केदार यांनी दिली. आठवडय़ातून दोन दिवस दर्शनासाठी मंदिर सुरू ठेवण्यासंदर्भातील ग्रामस्थांची मागणी वरिष्ठांपर्यंत कळविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तर, कंत्राटदार कंपनीच्या वतीने जितेश झा यांनी मात्र दोन दिवस बंद ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न होणार आहे. परंतु, रात्री काम करणे अशक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.