सन-सनावळी, युद्ध, वंशावळ, क्रांतीने नटलेला इतिहासाचा विषय सर्वासाठी तसा क्लिष्टच. मात्र ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावी, त्यांना इतिहासाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी येथील शिशुविहार व बालक मंदिर मराठी माध्यमाने पुढाकार घेत शाळेत वर्षभरासाठी एक अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमाची सांगता गुरुवारी ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून झाली. प्रदर्शनात अश्मयुगीन ते शिवकालीन इतिहासाची धावती सफर घडवण्यात आली.
शिशुविहार व बालक मंदिर मराठी माध्यमाच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सक्रिय सहभाग घेतला. प्रदर्शनाचे उद््घाटन साहित्य प्रसार केंद्राचे प्रमुख मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी दिवाकर कुलकर्णी, विभागप्रमुख नीता पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अश्मयुगीन इतिहासातील दगडाची अवजारे, त्या वेळची शेती, अग्नीचा लागलेला शोध, भांडी याच्या प्रतिकृती मातीपासून तयार केल्या. अश्मयुग, लोकजीवन, नगररचना, सांस्कृतिक जीवन याचे दर्शन प्रतिकृतींच्या माध्यमातून घडविण्यात आले. मध्ययुगीन भारतातील स्थापत्यशैली दर्शविण्यासाठी त्या वेळी उभारलेली गेलेली मंदिरे व स्तूप अधोरेखित करण्यात आले. शिवकालीन इतिहास समोर यावा यासाठी माती, पुठ्ठा, रांगोळीचे रंग आदींच्या मदतीने प्रतापगड, रायगड, शिवनेरी यासह महत्वाच्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली. किल्ले, शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांची सचित्र माहिती भित्तिपत्रकाद्वारे देण्यात आली. शिवकालीन हत्यारे, नाणी यांच्या प्रतिकृती, त्या वेळची लोकवस्ती कशी होती अशा अनेक बाबींची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवकालीन आरमार विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून साकारले. शिवरायांचा इतिहास मुलांना समजावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारी ‘शिवराज्यभिषेक सोहळा’ ही नाटिका सादर करण्यात आली.
दरम्यान, विद्यालय दरवर्षी एखादा विषय घेऊन त्याचे विविध पैलू विद्यार्थ्यांना समजावे यासाठी प्रदर्शनाची संकल्पना राबवते. यंदा इतिहास डोळ्यांसमोर ठेवत मूल्यशिक्षणाच्या तासिकेला या विषयी माहिती देण्यात आली. मुलांनी स्वत: शाळेतील संदर्भग्रंथ, विविध संकेतस्थळावर उपलब्ध माहिती संकलित केली. इतिहास शिक्षकांचे मार्गदर्शन घेत या प्रदर्शनात काय काय मांडता येईल, बाकीच्या मुलांना कशी माहिती देता येईल यादृष्टीने नियोजन केले. १५ दिवसांत प्रदर्शनाची मांडणी करीत प्रतिकृती, तक्ते तयार करीत प्रदर्शन प्रत्यक्षात आल्याचे पाटील यांनी सांगितले.